मोदी जिंकले,
मीडिया हरली !
गुजरातेत भारतीय जनता पक्षाला खणखणीत बहुमत मिळाले आहे. त्यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना सणसणीत चपराक बसली आहे, परंतु नाक कापले तरी *** शिल्लक आहे! अशा वृत्तीने सेक्युलर मुखंड वागताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी हे निष्कलंक आहेत. प्रामाणिक आहेत. क्षमतावान आहेत. कुशल संघटक आहेत. प्रखर देशभक्त आहेत. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहेत. प्रशासनावर त्यांची भारी पकड आहे. इस्लामी अतिरेक्यांचे ते यमदूत आहेत. हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा आहे. ते अष्टावधानी आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. ते तत्त्वज्ञ आणि विचारवंत आहेत. नरेंद्र मोदी हे उत्तम लेखक आणि कवी आहेत... ही यादी आणखीही लांबविता येईल, परंतु असे असतानाही केवळ हिंदुत्व द्वेषावर पोषण झालेल्या मीडियातल्या स्वयंघोषित विचारवंतांनी मोदींचा दुस्वास केला आणि करीत आहेत. अशा कावळ्यांच्या शापाने काहीही फरक पडत नाही हेच खरे.
भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा सत्तेत येईल तेव्हा नरेंद्र मोदी हे निश्चित पंतप्रधान बनतील. बनू शकतील असे माझे म्हणणे नाही - ते पंतप्रधान बनतीलच! कारण ती क्षमता त्यांच्यात आहे. हा निष्कर्ष कदाचित अनेकांना रुचणारा नसेलही, परंतु सत्याकडे आपण किती काळ दुर्लक्ष करू शकतो? तुमच्या आमच्या म्हणण्याने विदूषक लालूप्रसाद तत्त्वज्ञ बनणार नाही आणि अब्दुल करीम तेलगी काही धर्मराज बनणार नाही.
खूप कमी लोकांना माहीत असेल की, दिल्ली येथील भाजपाचे मुख्यालय 11, अशोका रोडच्या मागे एका छोट्या खोलीत नरेंद्र मोदी कितीतरी वर्षे राहात होते. त्यांच्यासोबत होते भाजपाचे दुसरे महासचिव गोविंदाचार्य. त्यांच्या खोलीत एकच फोन होता. त्यांचे अंथरूण जमिनीवरच असायचे. नरेंद्र मोदींच्या कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असायचा...
नरेंद्र मोदी हे विद्यार्थी दशेत असताना नवनिर्माण आंदोलनात त्यांनी केलेले युवा संघटन पाहून लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी त्यांची पाठ थोपटली होती. हा तरुण पुढे देशाचे नेतृत्व करेल असे संकेतही त्यांनी दिले होते. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा यांचे संस्कार त्यांच्यावर स्वयंसेवक आणि प्रचारक राहिल्याने आहेतच, परंतु मीडियाने त्यांची प्रतिमा मग्रूर आणि सहकाऱ्यांशी फटकून वागणारा, कोणालाही दाद न देणारा अशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुजरातेतील विजय हा भाजपाचा विजय नसून तो नरेंद्र मोदींचा आहे, हिंदुत्वाचा विजय नसून तो मोदित्वाचा विजय आहे, असे तारे तोडण्याचाही प्रयत्न जोरकसपणे सरू आहे. काहीही करून उलट्या बोंबा मारण्याचाच हा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदी यांचे पाय जमिनीवर असतात. भगवद्गीतेत भगवंताने सांगितलेली स्थितप्रज्ञ पुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. संघटित कार्याला ते प्राधान्य देतात. गुजरातेत मतदान होण्यापूर्वी दोन महिने नरेंद्र मोदी यांनी एक लाख 30 हजार भाजपा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली होती. प्रत्येक बूथचे नियोजन होते. स्वत: नरेंद्र मोदी यांच्याकडेही एका बूथची जबाबदारी होती. कार्यकर्त्यांच्या स्तरावर वावरणारा हा नेता व्यक्तिकेंद्री आहे, असा अपप्रचार करणे हा अपप्रचार करणाऱ्या बुद्धिजीवींचा खुजेपणाच म्हटला पाहिजे.
खूप कमी राजकीय नेते असे असतात की, जे केंद्रीय राजकारणाच्या मुख्य धारेत नसतात, मात्र केंद्रीय राजकारण त्यांच्याभोवती घुटमळत असते. अशा नेत्यांत नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. 57 वषार्र्ंचा हा ताठ कण्याचा नेता देशाच्या पंतप्रधानपदी यावा, असे भारतातील कोट्यवधी लोकांना वाटते. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदी हे विचार आणि तत्त्वांशी प्रामाणिक असतात, मग बहुमत काहीही असो. हा कणखरपणाच त्यांच्या यशाचे गमक आहे.
नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आले तर साऱ्या मुसलमानांचा ते सफाया करतील, असा गैरसमज पसरवण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. एक खरे की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर ते मुस्लिमांचा पर्सनल लॉ रद्द करतील, काश्मिरात अनिश्चित काळासाठी आणीबाणी आणतील, 370 कलम रद्द करतील, आयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण करतील. दररोज सकाळी 8 वाजल्यापासूनच लॅपटॉवर बसून प्रशासन हाकणारा हा नेता भारताला वैभवावर नेईल.
विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा- कोणा व्यक्तीसाठी नव्हे, या स्वामी विवेकानंदांच्या संकेतानुसार वाटचाल करणारा हा नेता आहे. आपण ओबीसी आहोत, असा बाऊ त्यांनी कधी केला नाही. सोनियाबेनप्रमाणे नरेंद्र मोदी हे टपकलेले नेते नाहीत. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
""मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी सी.एम. बनलो नाही. मी मूलत: सी.एम.च आहे. मी आज सी.एम. आहे. पुढेही सदैव सी.एम. राहीन. माझ्या दृष्टीने सी.एम. म्हणजे कॉमन मॅन.'' नरेंद्र मोदींच्या या मोजक्या शब्दांत खूप अर्थ भरलेला आहे.
अत्यंत कठीण समयी धीराने आणि संयमाने वागणारा हा नेता आज विजयश्री गळ्यात पडलेली असतानाही तेवढाच शांत आणि संयमी आहे. विजयश्री खेचून आणणारा योद्धा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्रिवार अभिनंदन!
-सिद्धाराम भै. पाटील
दि. 24 डिसेंबर 2007, दै. तरुण भारत पान 4
No comments:
Post a Comment