वेदप्रताप वैदिक
| Aug 20, 2013, 00:03AM IST
दरवर्षी स्वातंत्र्यदिनास आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण देत असतात आणि सर्व मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील जनतेला उद्देशून भाषण देत असतात; परंतु यावर्षीचा स्वातंत्र्यदिन देशाच्या इतिहासात आश्चर्यकारक ठरला आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले आणि अन्य एका नेत्याने राज्याच्या जनतेस संबोधित केले. पंतप्रधान आणि अन्य व्यक्तीच्या भाषणाची तुलना झाली असे यापूर्वी कधी घडले नव्हते. यापूर्वीही पंतप्रधानांच्या भाषणाची प्रशंसा आणि टीका झालेली आहे; परंतु यंदा प्रथमच भाषणांची नव्हे, तर वक्त्यांची तुलना करण्यात आली. तीसुद्धा थेट पंतप्रधानपदावरील व्यक्तीची एका मुख्यमंत्र्याशी. मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलना कशी होऊ शकते? देशाच्या विविध दूरचित्रवाहिन्या भाजप किंवा गुजरात सरकारच्या नियंत्रणाखाली तर नाहीत! जर त्यांची इच्छा नसेल तर मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची कोणी त्यांना जबरदस्ती केली असती का? माध्यमांनी स्वत:च्या मर्जीनेच पंतप्रधानांच्या दीडपट मोठे असलेले मोदींचे संपूर्ण भाषण सतत प्रसारित केले आणि दिवसभर त्या दोघांच्या भाषणांची तुलना केली; असे का घडले असावे?
जर मोदींच्या बाबतीत ‘कहां राजा भोज और कहां गंगू तेली’ ही म्हण लागू पडते तर मग मनमोहनसिंगांच्या तुलनेत मोदी सवाई नव्हे, तर दीडीने का भारी पडले? मोदींच्या संदर्भात येथे तेली शब्दाचा वापर केला. वास्तविक तो तर जातिवाचक आणि अपमानजनक शब्द आहे. याकडे दुर्लक्षही केले तरी देशातील बातमीतंत्राने मोदींना हातोहात उचलले, याचे कारण काय? तर देशातील कोट्यवधी नागरिक मनमोहनांच्या ऐवजी मोदींचे भाषण ऐकण्यास उत्सुक आहेत हे माध्यमांनी हेरले होते. त्यांना केवळ टीआरपीकडे लक्ष द्यायचे होते. सर्व मुख्यमंत्र्यांनी भाषणे केली; परंतु मोदींशिवाय अन्य कोणत्याही मुख्यमंत्र्यांचे भाषण कोणत्याही वाहिन्यांनी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ दाखवलेले नाही. पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणास राष्ट्रीय संबोधन समजून ऐकलेच पाहिजे, हा तर्कच मूर्खपणाचा आहे आणि ऐकून तरी का घ्यावे? इतिहासाची पाने चाळून पाहिली तर असे दिसून येईल की, नेहरू, इंदिरा गांधी, मोरारजी, चरणसिंह आणि अटलजींच्या भाषणांवरही विरोधकांनी कडाडून टीका केली आहे. इतकेच नव्हे, तर त्यांच्या भाषणांची थट्टाही केली आहे. लाल किल्ल्यावरील भाषण हे केवळ राजकीय असते. त्यात कडू-गोड, ऊन-सावली, बचाव आणि हल्ले आशा-निराशा, प्रेरणा-संवेदनशीलता इत्यादींचा समावेश असतो. त्यात कधी नरमाई, तर कधी कठोरता दिसून येत असते.
यापूर्वी कोट्यवधी जनता लाल किल्ल्यावरील भाषण ऐकण्यासाठी रेडिओला कान लावून बसत होती किंवा टीव्हीवर नजरा खिळवून बसायची; परंतु गेल्या दहा वर्षांत यात खूप फरक पडला आहे. आताची भाषणे निस्तेज, निष्प्राण आणि नीरस होत आहेत. ते एका राष्ट्रीय नेत्याचे भाषण नसते, तर एखाद्या नोकरशहाचा घासून गुळगुळीत झालेला कंटाळवाणा अहवाल असतो. यामुळे लोक लाल किल्ल्यावरील भाषणे ऐकण्यापेक्षा अंथरुणावर पडून राहणे पसंत करतात किंवा जे नागरिक लाल किल्ल्यावर जातात, त्यातले अनेक जण झोपी जातात; परंतु मोदींनी या संधीचा नेमका फायदा करून घेतला. मोदींनी एका अ(पेक्षित)भाषणाच्या तुलनेत भाषण ठोकले. ते लाल किल्ल्यावरील वैकल्पिक भाषण ठरले आणि मोदी वैकल्पिक पंतप्रधान!
मोदींच्या भाषणात त्यांनी उद्याच्या भारताचे कोणतेही महान चित्र रंगवलेले नव्हते किंवा भारताला सतावणा-या जटिल समस्यांवर व्यावहारिक तोडगाही नव्हता अथवा जनतेला उत्स्फूर्तपणे उठाव करायला लावणारा अवतारी संदेशही नव्हता, हे तरी बरे! परंतु एक विरोधी पक्षनेता या नात्याने त्यांनी पंतप्रधानांची चांगलीच हजेरी घेतली. आपल्या भाषणप्रसंगी मोदी एखाद्या गंभीर दृष्टिकोन असणा-या नेत्यांऐवजी एखाद्या उच्च दर्जाच्या वृत्तपत्रातील उत्तम संपादकीय लेख लिहिणा-या लेखकांसारखे वाटले. दोन नेत्यांच्या नेतृत्व क्षमतेची तुलना करण्यासाठी भारत आणि गुजरातची तुलना केली पाहिजे, असेही आवश्यक नाही, हे तर उघड आहे.कोणत्याही पंतप्रधानातील भाषणातील त्रुटी प्रभावीपणे दाखवून देण्याचे काम एखादा पत्रकारच करू शकतो; पण सद्य:स्थितीत आपणास राष्ट्रनिर्माणाची ब्ल्यूप्रिंट हवी आहे. गरिबी दूर कशी होईल, श्रीमंत-गरिबीतील अंतर कसे कमी होईल, दहशतवाद कसा मोडून काढता येईल, धार्मिक वाद कसा मिटेल, सरकार जनतेप्रती उत्तरदायी कधी होईल, परराष्ट्रीय धोरणसंदर्भातील आव्हानांचा सामना कसा होईल हे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत. त्यांची उत्तरे पंतप्रधान आणि वैकल्पिक पंतप्रधान या दोघांकडूनही देशाला हवी आहेत.
मनमोहनसिंग या प्रश्नांची उत्तरे देऊ शक ले असते किंवा याची उत्तरे त्यांच्याकडे असायला पाहिजेत. कारण त्यांना तर दहा वर्षे मिळाली होती. जर वेळकाढूपणाचे धोरण ठेवणे ही एक कला असेल तर मनमोहनसिंग त्या कलेत निपुण आहेत. त्यांच्या हाती असलेल्या शून्याला ते आकडेवारींने भरू लागले आहेत. आम्ही दहा वर्षांत इतके टक्के विकास केला, इतक्या शाळा-महाविद्यालये काढली, इतक्या लोकांना पैसे वाटले, इतक्यांना धान्य वाटप करणार आहोत. ही आकडेवारी खरी असेल तर जगातील सर्वाधिक गरीब, अशिक्षित आणि सर्वात जास्त उपासमारीने त्रस्त लोक आपल्याच देशात का आहेत?
जेव्हा तुम्ही अशा अनाकलनीय आकडेवारींचा वर्षाव करता, तेव्हा असे वाटते की, देशातील खाऊन-पिऊन सुखी असणा-या मध्यमवर्गीयांचे प्रतिनिधी आहात; 120 कोटी जनतेचे नव्हे! चीन आणि पाकिस्तानच्या ताज्या कारस्थानांमुळे संपूर्ण देश धुमसतो आहे. तुम्ही संयमी दृष्टिकोन दाखवला, मुत्सद्देगिरीच्या दृष्टीने हे योग्य आहे. परंतु तुम्ही असे काही बोलता की, लोकांचा रक्तदाब कमी होतो आणि शेजारी राष्ट्रातील अनुचित घटकांच्या नसांत रक्त उसळू लागते. आपल्या देशाच्या ‘प्रामाणिक पंतप्रधानाने’ ज्या मुद्द्यावर तुटून पडावे, अशी अपेक्षा संपूर्ण देश करतो आहे, त्या ठिकाणी पंतप्रधान आपल्या शेवटच्या भाषणात मौन बाळगतात हे कशाचे द्योतक आहे? की हे संपूर्ण भाषण अराजकीय आहे, असे तर दर्शवत नव्हते? पंतप्रधानांच्या या शेवटच्या भाषणाने देशाला संदेश दिला आहे की, ते स्वत: राजकारणी नाहीत. ते थकले आहेत. ते काहीही असो, असे उदासीन नेतृत्व मिळूनही राष्ट्र थकलेले नाही, याचा आम्हाला अभिमान आहे. ते संपूर्ण ताकदीनिशी पुढे वाटचाल करत आहे आणि एका नव्या सूर्योदयाच्या प्रतीक्षेत आहे.
(लेखक परराष्ट्र धोरणविषयक समितीचे अध्यक्ष आहेत.)
http://divyamarathi.bhaskar.com/article/EDT-article-on-narendra-modi-and-manmohan-singh-4351826-NOR.html
No comments:
Post a Comment