Thursday, September 26, 2013

सोलापुरात होणार विवेकानंद साहित्य संमेलन

१५० व्या जयंतीवर्षानिमित्त ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन
सोलापूर | युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर २०१३ रोजी सोलापूरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. हिंदी साहित्यातील प्रख्यात लेखक श्री. नरेंद्र कोहली (दिल्ली) यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

सार्ध शती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताने आयोजिलेल्या या संमेलनासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून सुमारे दीड हजार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विविध परिसंवाद व सत्रांमध्ये संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, राष्ट्रीय विचारांचे साक्षेपी अभ्यासक व लेखक तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यासह अनेक मान्यवर लेखक व विचारवंत सहभागी होतील.

संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी ग्रंथदिंडी व सायंकाळी विवेकानंदांवर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम होईल. शेगांव येथील श्री गजानन महाराज संस्थानचे मुख्य विश्‍वस्त शिवशंकर पाटील हे स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समिती, महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष आहेत. सोलापुरातील उद्योजक ए. जी. पाटील यांची संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी तर सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे यांची स्वागत सचिवपदी निवड झाल्याची माहिती संमेलनप्रमुख अरुण करमरकर यांनी दिली.

संमेलनात प्रतिनिधी म्हणून सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी
vsammelan13@gmail.com  किंवा ९४२२६४९२३९ वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र कोहली यांचा परिचय
श्री. नरेंद्र कोहली हे हिंदी भाषेतील साहित्यिक आहेत. आधुनिक हिंदी साहित्यावरील त्यांच्या प्रभावामुळे हिंदी साहित्यात १९७५ नंतरचा काळ हा ‘कोहली युग’ म्हणून ओळखला जातो. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित ‘तोडो कारा तोडो’ ही ग्रंथ मालिका लिहिली. कोणत्याही भाषेत विवेकानंदांवर निर्माण झालेल्या साहित्यकृतींमध्ये ही सर्वश्रेष्ठ साहित्यकृती मानली जाते. १९७० ते २००६ या ३६ वर्षांत ७८ पुस्तके लिहिण्याचा विक्रम त्यांच्या नावे आहे. प्रभू रामचंदांवरील अभ्युदय, न भूतो न भविष्यती, वासुदेव हे ग्रंथ विशेष गाजले.
संमेलनाचे अध्यक्ष नरेंद्र कोहली

विवेकानंद साहित्य संमेलन 2013

विवेकानंद साहित्य संमेलन 2013

विवेकानंद साहित्य संमेलन बोधचिन्ह (logo)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी