Saturday, December 10, 2016

कन्याकुमारीहून गीता जयंती पत्र


कन्याकुमारीहून गीता जयंती पत्र

भगिनींनो आणि बंधूंनो,
सप्रेम नमस्कार

गीता जयंती जवळ येत आहे. साधारणपणे, आपण कुटुंबांचे एकत्रीकरण करून गीता जयंती साजरी करतो. गीता हा जीवनाच्या सरते शेवटी अभ्यासण्याचा ग्रंथ नाही. आपल्या जीवनाचे नेकमे उद्दिष्ट काय आणि ते जीवनात उतरवायचे कसे हे समजून घेण्यासाठी गीतेचा अभ्यास करायचा असतो. म्हणून अगदी लहानपणापासून गीतेचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गीता अभ्यासण्यासाठी घरापेक्षा दुसरे चांगले ठिकाण असू शकत नाही. गीतेमध्ये उपनिषदांचे सार आहे आणि गीतेतील अतिशय मूलगामी अशा विचारांनी केंद्र प्रार्थना बनलेली आहे. हे विचार लोकांपर्यंत न्यावे आणि या तत्त्वाच्या आधारे आपली जीवने घडावीत यासाठीच माननीय एकनाथजींनी विवेकानंद केंद्राची स्थापना केली आहे.
गीता माणसाला जीवनाचे संपूर्ण चित्र समजावून सांगते आणि जीवनात आपल्या वाट्याला जे काही येईल ते कर्तव्य म्हणून करायला शिकवते. गीता माणसाला त्याचे कर्तव्य करण्यासाठी प्रेरित करते. घरातील मोठ्यांकडे पाहून मुले शिकत असतात. कर्तव्य मनोभावे पूर्ण करण्याचे संस्कार घरातील वडीलधार्‍यांकडूनच होत असतात. परंतु, घरातील सदस्यांप्रती, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण चराचर सृष्टीविषयी आपले कर्तव्य काय हे समजायचे असेल तर जीवनाविषयीचा आपला दृष्टीकोन पुरेसा स्पष्ट असणे आवश्यक असतो. भगवद्गीता आपल्याला ही दृष्टी देते.
गीतेत म्हटले आहे,
आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योर्जुन । (6।32)
सर्व गोष्टींकडे स्वत:ची अभिव्यक्ती म्हणून पाहतो.
एकात्मतेची दृष्टी (व्हिजन ऑफ वननेस) ही माणसाला कुटुंब, समाज, राष्ट्र आणि सृष्टीकडे स्वत:चेच विस्तारित रूप म्हणून पाहण्यास शिकवते. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये असा द्वंद्व निर्माण होतो तेव्हा माणूस आपल्या विस्तारीत रूपाच्या बाजूने कौल देतो. आपल्या केंद्र प्रार्थनेच्या सुरुवातीला हेच सांगितले आहे. जय जय परमात्मन्. (ईश्‍वराचा विजय असो.) म्हणजे विस्तारित ‘स्व’चा, उच्च स्वार्थाचा विजय असो; क्षुद्र ‘मी’चा नव्हे!
‘प्रजापती ब्रह्माने मानवजातीची आणि त्यासोबत यज्ञाचीही निर्मिती केली. जेणेकरून, मनुष्याच्या सार्‍या इच्छा पूर्ण होतील आणि तो सुखी होईल.’ (3।10)
मग, तो म्हणाला, ‘तुम्ही या यज्ञाद्वारे देवतांना उन्नत करा आणि त्या देवता तुम्हाला उन्नत करू दे. अशा प्रकारे निस्वार्थ भावनेने एकमेकांना उन्नत करत तुम्ही लोक परम् कल्याणाला प्राप्त व्हाल.’ (3।11)
यज्ञ म्हणजे काय ? यज्ञ म्हणजे निस्वार्थपणे, सर्वांच्या कल्याणासाठी आत्मसमर्पणाच्या भावनेने हाती घेतलेले कोणतेही काम. यज्ञ म्हणजे स्वत:, कुटुंब, जाती, समाज, राष्ट्र, सृष्टी यांच्यासाठी एखाद्या व्यक्तीने सेवा आणि समर्पणाच्या भावनेने झोकून देऊन केलेले कोणतेही काम. यज्ञ म्हणजे जीवनाच्या विस्तारत जाणार्‍या स्तरांचे (कुटुंब, जाती, समाज, राष्ट्र, संपूर्ण सृष्टी) पोषण करणे, त्यांना सामर्थ्य देणे.
व्यक्तीचे पोषण कुटुंबात होते; त्यामुळे तिच्या जाणीवांचा विस्तार सुरूवातीला कुटुंबात शक्य आहे. कुटुंब हे व्यक्तीच्या जीवनाचे विस्तारित आणि सहजरूप आहे. अशाच रीतीने, कुटुंबाचे विस्तारित रूप म्हणजे जात आणि त्यामुळे कुटुंब हे जातीशी एकोप्याने वागते. जातीचे विस्तारित रूप म्हणजे समाज. त्यामुळे जाती या समाजाचे पोषण करतात. समाजाचे अतिविस्तारित रूप म्हणजे राष्ट्र आणि त्यामुळे राष्ट्राचे पुनर्निर्माण आणि विकास करणे हे समाजाचे उद्दिष्ट बनते. राष्ट्राच्या अस्तित्वाचे उद्दिष्ट हे संपूर्ण सृष्टीच्या प्रगतीसाठी योगदान देणे हे आहे, कारण राष्ट्र हे जगाचाच एक भाग आहे.
संपूर्ण सृष्टी ही ‘स्व’ ची किंवा परमात्म्याची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे परमात्मन् म्हणून आपल्या खर्‍या स्वरूपाची अनुभूती घेण्यातच एखाद्या व्यक्तीचा खरा विकास आणि विस्तार आहे. अनासक्त भावनेने आपल्यातील सारी उत्तमता वापरून कर्तव्य करण्यातूनच ही अनुभूती घेता येणे शक्य आहे. कोणतेही कर्तव्य प्रभावीपणे करण्यासाठी याहून वेगळी प्रेरणा असू शकत नाही. नाव नाही, प्रसिद्धी नाही; केवळ परमात्म्याची, आपल्या आतील अस्तित्वाची अनुभूती आणि कुटुंब, समाज, राष्ट्र व सृष्टी यासारख्या समूहातील समरसता, सुसंवाद हीच प्रेरणा. म्हणूनच, आपण आपल्या प्रार्थनेत म्हणतो, निजपरमहितार्थं कर्मयोगैकनिष्ठा:।
अशा प्रकारे मानवी जीवनाचे ध्येय हे या समूहांमध्ये व्यक्त झालेल्या आणि या सर्वांच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्त्वाशी एक होणे हे आहे. जीवन जगताना या सर्व व्यापक ईश्‍वरत्वाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच योग. हे आचरणात आणण्याचा मार्ग म्हणजे यज्ञ. एकात्मतेची दृष्टी (व्हिजन ऑफ वननेस) असणारी व्यक्ती ही सर्व प्रकारच्या विविधतांमध्ये अंतर्निहीत असलेल्या एकात्मतेचा गौरव करू शकते आणि त्यामुळे विविधतेला जपते, प्रोत्साहन देते; विविधता झिडकारून वा दाबून टाकत नाही. अशा प्रकारे केवळ यज्ञ किंवा योग जीवनशैलीतूनच सुसंवाद, समृद्धी नांदणे शक्य आहे. गीता आपल्याला हे शिकवते आणि म्हणूनच गीतेला जीवनात अतिशय महत्त्वाचे मानले गेले आहे. जीवनातील एकात्मतेचा हा संदेश भारताने जगाला द्यायचा आहे. कुटुंब, जात, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण सृष्टी यासारख्या स्वत:च्या विस्तारित अभिव्यक्तीचे पोषण आणि सहभाजन (शेअरिंग) यातून हे करावे लागेल. आज आपण पाहतोय की भारतासमोर अनेक बाहेरील आणि आतील धोके आहेत. दुर्दैवाने, आपण या आव्हानांशी तोंड देण्यात आणि ती ओळखण्यात एक राष्ट्र म्हणून कमी पडत आहोत. यासाठी राष्ट्रीयत्वाची भावना प्रबळ करणे आवश्यक आहे. आपल्या राष्ट्राचे उद्दिष्ट आणि राष्ट्रासमोरील आव्हाने याविषयी कुटुंबांमधून जागरूकता आणण्याची गरज आहे.
कुटुंबांमध्ये मुलांच्या शिक्षण आणि करिअरबाबत फार चांगली काळजी घेतली जाते. पण त्यांच्यामध्ये एकात्मतेची दृष्टी रूजवण्याचीही तेवढीच आवश्यकता आहे. मुलांना सांगण्याची गरज आहे की तुम्ही अमृताचे संतान आहात. सर्व शक्ती तुमच्यामध्ये विद्यमान आहे आणि तुमचा जन्म ईश्‍वरी कार्यासाठी झालेला आहे - वयं सुपुत्रा अमृतस्य नूनं तवैव कार्यार्थमिहोपजाता:।
हे विचार मुलांमध्ये  प्रयत्नपूर्वक रूजवले गेले, तर आपल्या दृष्टिकोनात प्रचंड सकारात्मक बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. जीवनात दृष्टीकोनाला फार महत्त्व आहे. कुटुंब म्हणजे केवळ माणसांचा समूह नव्हे; तो समाजाचा मूलभूत घटक आहे.
कुटुंबासमोर 3 उद्दिष्ट्ये आहेत.
1) धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यासाठी प्रयत्नशील राहणे हे कुटुंबाचे पहिले उद्दिष्ट.
2) सनातन धर्माची संस्थापना आणि संवर्धन करणे हे दुसरे उद्दिष्ट.
3) कुटुंबाच्या प्रयोजनामागे प्रजनन हेही एक उद्दिष्ट आहे. प्रजनन म्हणजे प्रकर्षेण जनन. अर्थात शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या आधीच्या पिढीपेक्षा सक्षम पिढी पुढे आणणे. थोडक्यात, जिथे माणसाची घडण आणि आणि राष्ट्र उभारणी शक्य आहे असे मूलभूत घटक म्हणजे कुटुंब.

गृहस्थाश्रम ही जीवनाची अशी पायरी आहे की जिथे माणूस वरील तीनही हेतु साध्य करण्यासाठी जोर लावू शकतो. आपण आपल्या कुटुंबाकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले तर सांस्कृतिक आक्रमणाला तोंड देणे सहज शक्य आहे. वृद्धाश्रम, अनाथाश्रम आदी गोष्टी स्वार्थी कुटुंब, पराभूत समाज आणि कृतघ्न पिढीची लक्षणे आहेत.
आदर्श कुटुंबाचे पाच आयाम आहेत, असे आपण म्हणू शकतो.
1) सुखी : आनंदी आणि संतुष्ट.
2) स्वस्थ : आरोग्यदायी.
3) संपन्न : आर्थिक ओढग्रस्तता नसलेले आणि गरजा सहज पूर्ण होणारे.
4) संस्कारक्षम : योग्य जीवनमूल्यांद्वारे मुलांना घडवण्यासाठी सक्षम.
5) समाज धारणा : राष्ट्रीय जाणीवेने कार्यरत.

आम्ही कुटुंबाचा विचार केवळ सुखी, संपन्न या दोन आयामांपुरतेच करतो, इतर आयामांचा विचार करत नाही असे म्हणून चालणार नाही. हे सर्व आयाम परस्परपूरक आहेत. कुटुंबाने राष्ट्रीय सुरक्षेकडे दुर्लक्ष केले तर कुटुंबाचे सुख, आरोग्य आणि संपत्ती धोक्यात येऊ शकते. गीता जयंती कार्यक्रमाचे आयोजन करताना आपण या सर्वच आयामांवर लक्ष दिले पाहिजे. बहुतेक घरांमध्ये नियमित पूजा केली जाते. पण आता स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या जीवंत ईश्‍वराचीही पूजा करावी लागेल. हेच आपल्या केंद्र प्रार्थनेत सांगितले आहे...
निष्कामबुद्ध्यार्त विपन्नसेवा,
विभो ! तवाराधनमस्मदीयम् ।

हे व्यक्तीला लागू आहे तसे कुटुंबालाही लागू आहे. आपण आपल्या पोषणासाठी समाजाकडून घेतो, त्याहून अधिक समाजाला परत केले पाहिजे...
जीवने यावदादानं स्यात् प्रदानं ततोधिकम्... 

आदर्श कुटुंबासाठी काही कार्यबिंदू पुढीलप्रमाणे असू शकतात...
१. कुलदेवतेची नियमित पूजा, उपासना.
२. कुटुंबातील प्रत्येकाने नियमित ध्यान, स्नान आणि व्यायाम केले पाहिजे.
३. आठवड्यातून एकदा कुटुंबातील प्रत्येकास तैलस्नान. तसेच भजन, नामजप. कधीकधी मोकळे वातावरण राहण्यासाठी काही चांगल्या पुस्तकांचे एकत्रित वाचन. काही गोष्टी आणि पूर्वजांविषयी काही चांगले किस्सेही सांगता येतील. या सर्वांमुळे कुटुंबाचे शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक पोषण होते.
४. पंधरवड्यातून एका दिवशी एकवेळ उपास करता येईल. हा दिवस एकादशी किंवा पौर्णिमा आणि अमावस्येचा निवडता येईल. हे अमृत सुरभीसारख्या उपक्रमांशीही जोडता येते. गरीबांसाठी रोज मूठभर धान्य/पीठ बाजूला काढून ठेवणे हा चांगला संस्कार आहे.
५. सर्व सांस्कृतिक उत्सव अर्थपूर्ण पद्धतीने आणि काळाची गरज ओळखून साजरे करणे - यामुळे सणांचे औचित्य राहते.
६. वर्षातून एकदा आई - बाबा, आजी - आजोबा यांच्यासह मुलांना घेऊन एखाद्या तीर्थस्थानी किंवा आध्यात्मिक ठिकाणी, आश्रम आदी ठिकाणी जाऊन राहणे.
७. समाजात चालणार्‍या चांगल्या कार्याशी कुटुंब जोडलेले असले पाहिजे; समाजातील इतरांसोबत मिळून काम करण्याचा अनुभव मुलांना मिळाला पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी हे आवश्यक आहे.
८. मुलांना केवळ माहिती आणि कर्मकांड शिकवून चालणार नाही. त्यांची दृष्टी विकसित झाली पाहिजे. भावनांचा विकास झाला पाहिजे. चालू घडामोडी आणि आव्हानांविषयी त्यांना जागरूक बनवले पाहिजे. यासाठी खोट्या प्रतिष्ठेच्या मागे न लागता आपल्या घरी येणारी पुस्तके, नियतकालिके यांची काळजीपूर्वक निवड केली पाहिजे.

अशा प्रकारे, गीता जयंतीनिमित्त होणार्‍या कुटुंब एकत्रीकरणाच्या कार्यक्रमात व्याख्याने, चर्चा, खेळ, गीतेतील श्‍लोक आणि विचारांवर आधारित स्पर्धा आदींचे आयोजन करता येईल. कुटुंबात राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांना महत्त्व मिळू लागल्याने कुटुंबातील इतर किरकोळ समस्याही आपापल्या ठिकाणी राहतात आणि कुटुंबात एकोपा नांदण्यास मदत होते. केंद्राशी संबंधित सर्व कुटुंबांचे खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रीकरण करून तिथे सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जागरुकतेवर भर देता येईल. मनुष्य निर्माण आणि राष्ट्र पुनरुत्थानाच्या दिशेने टाकलेले हे मोठे पाऊल असेल. यातून अशा समाजाच्या विकासाला हातभार लागेल की जिथे सर्व प्रकारची विविधता आपली भिन्न भिन्न वैशिष्ट्ये आणि समृद्धीसह एकत्र येईल.
एकात्मतेची विशाल दृष्टी (ग्रँड व्हिजन ऑफ वननेस) येथे साकार झालेली असेल. स्वामी विवेकानंदांचे विचार सत्यात येतील.
स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवासह पुनश्‍च आपल्या सिंहासनावर आरुढ झाली आहे.
शांतिमंत्राने आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या!


बी. निवेदिता
राष्ट्रीय उपाध्यक्ष, विवेकानंद केंद्र, कुन्याकुमारी

Wednesday, August 3, 2016

Sunday, April 10, 2016

सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन । बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी सोलापूर येथे प्रकाशन झाले. या कार्यक्रमाच्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या...
द‌ै. लोकमत, सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. दिव्य मराठी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. संचार । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. सकाळ । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

दै. पुण्य नगरी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी

सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन

सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राने काढलेल्या विवेक विचार मासिकाच्या अभिवादन विशेषांकाचे शनिवारी प्रकाशन झाले. यावेळी डावीकडून विठ्ठल पाथरूट, केंद्राचे संचालक दीपक पाटील, पीपल्स रिपाइंचे नेते राजाभाऊ इंगळे, ज्येष्ठ पत्रकार अरूण करमरकर, जी. एम. ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे, सिद्धाराम पाटील.

मनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.
((विशेषांकासाठी संपर्क : 8855872228))
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.




करमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.

बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.

प्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

http://epaper.lokmat.com/newsview.aspx?eddate=04/10/2016&pageno=3&edition=90&prntid=1714&bxid=25894124&pgno=3

Wednesday, April 6, 2016

सर्वस्पर्शी बाबासाहेब या विषयावर शनिवारी अरुण करमरकर यांचे व्याख्यान

विवेकानंद केंद्रातर्फे आयोजन
सोलापूर – विवेकानंद केंद्राचे मासिक विवेक विचारच्या वतीने शनिवारी (९ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फडकुले सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या १२५ पानी विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, विठ्ठल पाथरुट, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.

विशेषांकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रचिंतनाचे विविध पैलू आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यात आले आहे. शेषराव मोरे, रमेश पतंगे, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अभिराम दीक्षित, मुजफ्फर हुसेन, अरुण करमरकर आदी मान्यवर विचारवंतांचे लेख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लेखाचा समावेश या विशेषांकात केला आहे. मूल्य ५० रुपये असून होमगार्ड मैदानाजवळील विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात अंकाची पूर्वनोंदणी सुरू आहे.

Tuesday, March 15, 2016

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा


भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मासिक

स्पर्धा कोणासाठी ? पदव्युत्तर विद्यार्थी. तसेच २० ते ३० वयोगटातील कोणीही.
निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक ? १५ आॅगस्ट २०१६.
शब्दमर्यादा किती? १५०० ते २००० शब्द.

निबंधाचे विषय
१. बाबासाहेबांचे राष्ट्रचिंतन
२. बाबासाहेबांचे धर्मचिंतन
३. बाबासाहेबांचे अर्थचिंतन
४. घटनाकार बाबासाहेब
५. तरुणांचे प्रेरणास्थान बाबासाहेब
(वरीलपैकी एका विषयावर निबंध अपेक्षित.)
पारितोषिके :
प्रथम – रु. ७०००/-
द्वितीय – रु. ५०००/-
तृतीय – रु. ३०००/-.
याशिवाय सहभागींना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह.
निबंध पाठवण्याचा पत्ता : विवेक विचार, विवेकानंद केंद्र, १६५ रेल्वे लाईन्स, सोलापूर. ४१३००१ किंवा vivekvichar@vkendra.org
अधिक माहितीसाठी : 9769179823

Thursday, February 11, 2016

राजकारणात संस्कृतीचे राजदूत - पंडित दीनदयाल उपाध्याय


सिद्धाराम भै. पाटील

‘ज्या समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी रामाने वनवास स्वीकारला, कृष्णाने संकटे झेलली, राणा प्रताप रानावनात भटकत राहिले, शिवाजींनी सर्वस्व समर्पित केले, गुरू गोविंद सिंगांच्या मुलांना भिंतीत चिणून ठार करण्यात आलं, त्यासाठी आम्ही आमच्या जीवनातील आकांक्षा आणि खोट्या आशांचा त्याग करू शकत नाही काय?’’

Thursday, February 4, 2016

पुस्तकातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर आहे "म'


भाषाशास्त्रातील नावीन्यपूर्णप्रयोग
विज्ञान, तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग होतात, त्याप्रमाणे भाषेच्या प्रांतातही प्रयोग होत असतात. मराठी साहित्यामध्ये असाच एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. सोलापुरातील लेखक गोवर्धनलाल बजाज यांनी. मराठी भाषा लवचीक आहे. या वैशिष्ट्याचा कौशल्याने वापर करत श्री. बजाज यांनी सुमारे १०० पानांचे एक पुस्तक लिहिले आहे. मंगलम् मंगलम् मधुचंद्रम्! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील प्रत्येक शब्दाची सुरुवात "म’ या अक्षराने होते. अनुप्रास अलंकाराने नटलेले हे पुस्तक विश्वविक्रमी ठरावे असे आहे.

Thursday, January 21, 2016

९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !


सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.

Saturday, January 2, 2016

श्रीपाल सबनीस उठले अन् तुम्हीच माझे शरद पवार म्हणत सगळ्यांच्या देखत भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले


 
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांची वस्त्रे उतरवणारा, लबाडी वेशीवर टांगणारा युवा पत्रकार घनश्याम पाटील यांचा खळबळजनक लेख - कुत्र्याला खीर पचली नाही! .

श्रीपाल सबनीस यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्‍वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.

संपूर्ण लेख पुढील प्रमाणे...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी