Thursday, January 21, 2016
९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.
शिवयोगी सिद्धराम एका वचनात विचारतात, ‘शिवलिंग धारण न करणाऱ्याला नास्तिक म्हणावे काय? मुळीच नाही. वेद आणि वेदांताचा अभ्यास करून शिवलिंग धारण न करणाऱ्याला नास्तिक म्हणता येईल काय? मुळीच नाही. केवळ विधीक्रियेत समरस न होणाऱ्याला नास्तिक न म्हणता अनुभवसंपन्न असणाऱ्याला नास्तिक म्हणता येईल काय? मुळीच नाही. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, मद्यपान, मांसभक्षण, परस्त्रीसंग आणि परधनाचे अपहरण करणारा आणि आत्मज्ञान नसलेलाच नास्तिक होय.’
ते खऱ्या अर्थाने पुरोगामी होते. त्यांनी आपल्या वचनांमधून समाजाला अंधभक्तीपासून परावृत्त करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. शब्दांचे महत्त्व, भाषेचे सौंदर्य, अध्यात्माची खोली, व्यवहारातील बारकावे, वेद, उपनिषद, पुराणांतील उदाहरणे, समाजमनाची जाण, मानवी मनोव्यापारांची सूक्ष्म माहिती असलेले सिद्धराम हे बहुपैलू व्यक्तिमत्त्व होते. समाजासमोरील अडचणींची त्यांना जाण होती. शिवभक्तीच्या धाग्याने त्यांनी लोकसंग्रह केला. लोकसंग्रह झाल्यानंतर त्यांनी भक्ती आणि कर्मयोगाचा त्यांच्यावर संस्कार केला. तलाव खोदणे, मंदिर उभारणी करणे या माध्यमातून त्यांनी मुनष्यबळाची व्यवस्था केली. आदर्श व्यक्ती, सुखी कुटुंब, निरोगी समाज निर्माण होईल यासाठी त्यांनी पारंपरिक तत्त्वज्ञान सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत मांडले.
शिवयोगी सिद्धराम हे योगशास्त्राचे जाणकार आणि साधक होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष म्हणूनही त्यांचा उल्लेख करण्यात येतो. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या श्रमदानातून तलाव खोदले, गरीब व निराश्रितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाहसोहळ्याची सुरुवात केली. बाराव्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम हे समाजसुधारक योगी होते. तसेच, ते एक संवेदनशील भावकवीही होते. त्यांच्या अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले.
कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणत होते. म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून 68 हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील केवळ 1300 वचनेचआज उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते तसे तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान ठायी ठायी व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते. प्रमाणबद्ध बोलणे म्हणजे वचन. वचन म्हणजे केवळ गद्य नव्हे किंवा पद्यही नाही, पद्याचा गंध असलेले गद्य म्हणजे वचन. आध्यात्मिक भावगीत म्हणजे वचन.
सर्वच भारतीय महापुरुषांच्या मागे आध्यात्माची विशाल आणि सर्वव्यापी पार्श्वभूमी असल्यामुळे भिन्न भिन्न काळातील महापुरुषांच्या विचारांची एक समान बैठक दिसून येते. कर्मयोगी सिद्धरामांच्या वचनांमध्ये अध्यात्म आणि व्यवहार यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. संस्कृत भाषेमध्ये असलेले जीवनविषयक मूलभूत तत्त्वे सिद्धरामांनी लोकभाषेत आणली. मानवी जीवनाला उन्नत आणि अर्थपूर्ण करणारे विचार प्रासादिक भाषेतून मांडली. या वचनांमधून कधी ते आपल्याच मनाला उपदेश करतात तर कधी दंभाचारावर प्रहार करतात. काही वचनांमध्ये तर्कशुद्ध युक्तिवाद करून, उदाहरणे देऊन विवेकबुद्धी जागवतात.
पुनर्जन्माचा सिद्धांत हा भारतीय संस्कृतीमधील एक प्रमुख सिद्धांत आहे. परंतु या कर्मसिद्धांताचा चुकीचा अर्थ लावून नशिबावर अवलंबून निष्क्रिय राहणाऱ्यांना आणि वाईट संगत धरलेल्यांना सुधारक सिद्धाराम सांगतात, ‘पूर्वजन्मातील पुण्य आणि पाप या जन्मातील सुख आणि दु:खांना कारणीभूत नसते, तर सज्जनांचा सहवास हे सुखाचे कारण आहे आणि दुर्जनांचा सहवास हे दु:खाचे कारण आहे.’ (श्रीमद् आद्य शंकराचार्य यांचे एक वचन आहे, ‘जीवनात
तीन गोष्टी दुर्लभ असतात. एक, मनुष्य जन्म, दोन, मुक्तीची इच्छा आणि तीन, चांगल्या लोकांचा सहवास.’) जीवनाचे नंदनवन करायचे असेल तर चांगल्या
गोष्टींचा अंगीकार करणे हे उच्चतम मूल्य ठरते.
शिक्षणासंबंधी शिवयोगी सिद्धराम म्हणतात, ‘शिक्षण हे सद्गुणांच्या प्राप्तीसाठी असते, ते कान फुंकण्यासाठी असते काय ?’ आजच्या शिक्षणपद्धतीत सद्गुणप्राप्तीचा विचार होणे आवश्यक झाले आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण तर वाढत आहे. परंतु भ्रष्टाचार, गुन्हेगारी फोफावत असल्याचेही दिसत आहे. शिक्षणातून चांगला माणूस घडला पाहिजे. विद्येचा वापर करून चुगली करणे, भांडणे लावणे, दुसऱ्याचे वाईट करणे होत असेल तर त्याला शिक्षण म्हणता येणार नाही, असे त्यांना सांगायचे आहे. (स्वामी विवेकानंद शिक्षणाविषयी म्हणतात, ‘माणूस घडवणारे, चारित्र्य निर्माण करणारे आणि चांगले विचार आत्मसात करायला लावणारे शिक्षण हवे. मेंदूत अस्ताव्यस्तपणे कोंबलेला माहितीचा मारा म्हणजे शिक्षण नव्हे.’) अनुभवाशिवायचे ज्ञान हे फुकाचे असते. याचा अनुभव आपल्याला पदोपदी येतो. समाजाचे बारकाईने अवलोकन केलेल्या सिद्धरामांना याची जाणीव होती. म्हणूनच ते म्हणतात, विद्याभ्यास करून जो अनुभवसंपन्न होत नाही तो पिशाच्च होय.
अनुभव पुस्तकात मिळत नाही, असेही ते सांगतात. याचवेळी ते ज्ञानाचाही गौरव करतात. ते म्हणतात, ज्ञानशून्य क्रिया फलप्रद नसते. ज्ञानी माणसाचे
वागणे नम्र असावे अशी अपेक्षाही ते व्यक्त करतात. अनुभवाच्या बळावर जीवनात यशस्वी झालेली आणि व्यवहारी जगाचा अनुभव नसल्याने अपयशी ठरल्याची
उदाहरणे आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. भारतीय पुराणे आणि साहित्यात येणाऱ्या संकल्पनांची कालसुसंगत आणि तर्कशुद्ध मांडणीही कवी सिद्धराम करतात. चिरंजीव या संकल्पनेबद्दल ते म्हणतात, ‘चिरंजीव म्हणजे निरोगी, सशक्त आणि दीर्घकाळ जगणारा मनुष्य; मृत्यूवर मात करणारा नव्हे!’ या वचनातून ते अवास्तव कल्पना झुगारून देतात, त्याचवेळी आरोग्यदायी जीवनाचा गौरवही करतात. अस्पृश्यतेसारख्या समाजविघातक प्रथेविषयी प्रबोधन करताना ते म्हणतात, ‘कोणी शिवले म्हणून पाण्यात बुडाल्याने त्यापासून मुक्ती मिळते काय? एखाद्याचे मन दुखवून किंवा एखाद्याचे घर बुडवून गंगेत स्नान केल्याने पापमुक्त होता येणार नाही,’ असेही ते बजावतात. सिद्धरामांनी येथे धर्माचे नाव घेत अधर्म आचरण करण्याच्या प्रवृत्तीला उघडे पाडले आहे. मंदिरामध्ये भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. मंदिरांमध्ये जाऊन, पूजा अर्चा करून किंवा तीर्थयात्रा गंगा स्नान करूनही आपण आपले आचरण स्वार्थी, विकृत आणि संकुचित ठेवले तर त्याचा काहीही उपयोग नाही. आपण खऱ्या अर्थाने अध्यात्मिक झाले पाहिजे असे धर्मगुरू सिद्धरामांना सांगायचे आहे. ‘अरण्यातील ज्योतीप्रमाणे ध्यानशून्य पूजा व्यर्थ होय’ असे ते सांगतात. केवळ एक उपचार म्हणून पूजा करण्याऐवजी मनापासून ती केली पाहिजे असे ते सुचवतात.
शिवयोगी सिद्धराम यांच्या मनात दीन, दलित, वंचित आणि पीडितांविषयी आपलेपण आणि अपार करुणा होती. ते एका वचनात सांगतात, ‘गरिबाघरचे साधे जेवण हे अमृतासारखे तर श्रीमंताघरची पक्वान्ने ही सुरापानासारखी होत.’ सुख हे दैवदत्त नाही असे सांगून त्यांनी दैववाद नाकारला. मानवी मनाला उन्नत करणारी, कुटुंबाला सुखी करणारी, समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी पोषक असलेली शेकडो वचने शेकडो सिद्धरामांनी रचली आहेत. अर्थपूर्ण जीवन जगले पाहिजे. रूक्ष आणि निरस जीवन जगू नये, हे सांगताना शिवयोगी सिद्धराम म्हणतात, ‘कीर्ती न मिळवणाऱ्याचे जीवन विटलेल्या शिळ्या अन्नासारखे असते.’ प्रसिद्धी आणि कीर्तीसोबत येणाऱ्या दोषांपासूनही ते सावध करतात. ते म्हणतात, ‘लोकप्रियता ही शस्त्राने केलेल्या जखमेसारखी असते. ती फुलांच्या परिमळासारखीही असते.’
http://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-siddharam-patil-article-about-siddharam-5224957-NOR.html
Subscribe to:
Post Comments (Atom)
.
माझी टी.व्ही. मुलाखत पाहा...
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (12)
- congress (19)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (5)
- shivaji (4)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (4)
- अतिरेकी हल्ले (6)
- अध्यात्म (16)
- अनुभव (2)
- अन्य (3)
- आंबेडकर (18)
- आर्मी (4)
- इतिहास (29)
- इस्लाम (35)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (2)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (21)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (2)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (9)
- नक्षलवाद (5)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (7)
- पत्रकारिता (7)
- परिचय (10)
- पाक (2)
- पाकिस्तान (7)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (3)
- पोलिस (3)
- प्रज्ञा (2)
- बातमी (12)
- बातम्या (4)
- बुद्ध (6)
- भारत (4)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (16)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (13)
- मोदी (9)
- योग (5)
- रमेश पतंगे (1)
- राजकारण (28)
- विमर्श (6)
- विवेक विचार (17)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (57)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (7)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (22)
- संस्कृती (6)
- सामाजिक (9)
- सावरकर (2)
- साहित्य (7)
- सिद्धरामचे लेख (17)
- सुविचार (2)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (9)
- सोलापुर दंगल (5)
- सोलापुर बातमी (9)
- स्वामी विवेकानंद (3)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (32)
- हिंदू (9)
No comments:
Post a Comment