Tuesday, January 17, 2017

नव्या युगावर धनगर साहित्याचा ठसा!

दै. दिव्य मराठी, १७ जानेवारी २०१७

संजय सोनवणी

आ वाज उद्याचा...उद‌्गार उद्याचा’ हा नारा देत भारतातील पहिले “आदिवासी धनगर साहित्य संमेलन’ पार पडले. मूक समाजाचा आधुनिक काळातील पहिलाच साहित्यिक उद्गार हेच त्याचे वैशिष्ट्य नव्हते तर वैचारिक विश्वालाही नवविचारांनी नवे आशय देऊ शकतो, हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले जाणे हेही एक वेगळेपण होते.
http://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-quite-the-impression-on-the-world-of-the-new-material-5506909-NOR.html

या संमेलनात विविध विचारप्रवाहच नव्हे तर समाजघटकही सहभागी होते. या विविध विचारप्रवाहांना गंभीरतापूर्वक समजून घेणाऱ्या हजारांवर श्रोत्यांची दोन दिवस सलग उपस्थिती हेही एक वैशिष्ट्य. भूतकाळ समजून घेत वर्तमानाचे विश्लेषण करत भविष्याच्या दिशा ठरवणे हे साहित्याचे अंगभूत वैशिष्ट्य असते. ते या संमेलनात एवढे प्रकर्षाने दिसले की प्रस्थापित साहित्य संमेलनांनाही त्याची दखल घेणे भाग पडले.

या पहिल्यावहिल्या आदिवासी साहित्य संमेलनाचा मी अध्यक्ष होतो. हा एक ऐतिहासिक बहुमान माझ्या वाट्याला आला. आदिम समाजाशी आधुनिक युगातही नाळ घट्ट करत त्यांच्या भावविश्वात साहित्यिक दृष्टिकोनातूनही मला जोडून घेता आले. या समाजाला साहित्याची, नवविचारांची भूक आहे याची तीव्र जाणीव या संमेलनाने झाली.
प्रस्थापितांनी ज्यांना कधी जवळ केले नाही, ज्यांचे जीवन साहित्याचा विषय बनू शकतो याचा विचार केला नाही, त्यांनी स्वत:चे विश्व बनवण्यासाठी कष्ट उपसले तर काय चूक? हा प्रश्नही माझ्या मनात उपस्थित झाला होता. या संमेलनाने ती वाट करून दिली. रानावनांत खुल्या आभाळाखाली वाढलेली, बहरलेली धनगर संस्कृती नव्या युगावर धनगरांचेच पूर्वज मौर्य व सातवाहनांप्रमाणे नव्या युगावरही आपला ठसा उमटवायला सज्ज झाल्याचे चित्र ठळक झाले ही या संमेलनाची फलश्रुती ठरावी.

महाराष्ट्राला संस्कृती दिली ते ४३० वर्ष राज्य करणाऱ्या सातवाहन घराण्याने. हे घराणे पुढे आले ते धनगरांतूनच. हाल सातवाहनाची गाथा सप्तशती हा मराठीतील आद्य महाराष्ट्री प्राकृतातील काव्यसंग्रह. त्यातील जनजीवनाचे लोभस चित्रण हा आजही जागतिक वाङ‌्मयात चर्चेचा व अभ्यासाचा विषय. आजच्या मराठीचा हा आद्य स्राेत.
एका धनगरानेच मराठी साहित्य संस्कृतीचा पाया घातला. पण त्याची जाण मराठी सारस्वताने कधी ठेवली नाही. अखिल भारतीय साहित्य संमेलनाने तर कधी त्याचा नामोल्लेखही केला नाही. पण सोलापूरमधील ग्रंथदिंडीत मानाने विराजमान होती “गाथा सप्तशती’. एवढेच नव्हे तर ग्रंथदालनाचेही नाव होते “हाल सातवाहन ग्रंथनगरी’.

या संमेलनात सहभागी सिद्धराम पाटील, सौ. संगीता चित्रकुटे, विकास पांढरे, सुभाष बोंद्रेसारख्या विविध वक्त्यांनी धनगरी समाजाचे साहित्य व माध्यमांतील चित्रण समाधानकारक का नाही? यावर चर्चा केली. परिसंवादांचे अध्यक्ष असलेल्या घनश्याम पाटील, सचिन परब यांच्यासारख्या वक्त्यांनी त्यात अधिक आशय भरत निर्णायक स्वरूप दिले.
प्राचार्य शिवाजी दळणर, डाॅ. यशपाल भिंगेंनी इतिहास व वर्तमानातील आव्हानांवर विचार मांडले. अगदी आरक्षणावरही मुद्देसूद चर्चा झाली. कोणावरही टीका अथवा आगपाखड न करता एका संवेदनशील विषयावर चर्चा झाली हे विशेष.

धनगरांचे स्वतंत्र संमेलन भरवणे म्हणजे जातीवाद नव्हे काय? असा प्रश्न आधी मला काही लोक विचारत. मी एवढेच उत्तर देईन की “मला अध्यक्ष निवडले आहे यातच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे!’ आणि खरेच संमेलनात जवळपास ४०% वक्ते हे अन्य समाजांतील होते.
आज महाराष्ट्रातील गढूळलेल्या जातीय वातावरणात सर्वैक्याचा संदेश देणारे हे संमेलन घडले हे या संमेलनाचे सर्वात मोठे यश ठरावे.

राज्यकर्ते असोत की समाजातील वर्चस्ववादी घटक...ते जर घाबरत असतील तर संख्येला नव्हे तर विचारांना. समाज विचार करणारा व्हावा हे त्यांना मान्य नसते. धनगरच काय अन्य भटक्या विमुक्तांकडे, ओबीसींकडे पाहण्याचे जे साहित्यविषयक अाैदासिन्य आले आहे ते यातूनच! आता ते होणार नाही. हा प्रवाह फोफावत एका नदीचे रूप घेईल याचा मला विश्वास आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी