Friday, April 6, 2018

वीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण ?


🖋सिद्धाराम भै. पाटील
जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे असणे कसं शक्य आहे?


लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतला आहे. प्रक्रियेनुसार आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्रालाच याचा अंतिम निर्णय घ्यायचा आहे. केंद्र सरकारला तरी याचे अधिकार आहेत का, हा प्रश्नही अनुत्तरित आहे. परंतु, यानिमित्ताने वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू धर्माचीच शाखा आहे की स्वतंत्र धर्म हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे असणे कसं शक्य आहे?
१४ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताच्या रजिस्ट्रार जनरल यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कार्यालयाला लिहिलेले एक पत्र पुढे आले आहे. तेव्हाच्या गृहमंत्रालयाने भारताच्या रजिस्ट्रार जनरलचे मत मागवले होते. रजिस्ट्रार जनरलने लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची दोन प्रमुख कारणे सांगितली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरलने सरकारचेच जुने निर्णय, कर्नाटक हायकोर्टाचे मत आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना आधी वीरशैव म्हटले जायचे, ती हिंदू धर्मातीलच एक जात आहे. दुुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला तर या समाजातील अनुसूचित जातींच्या लोकांना सध्या मिळणाऱ्या आरक्षणापासून वंचित रहावे लागेल. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीआधी हा विषय पुढे आणल्याने राजकीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवूनच हा विषय पुढे रेटल्याचे स्पष्ट होत आहे.
स्वतंत्र धर्माची मागणी करणाऱ्यांचा एक महत्त्वाचा दावा आहे की लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात केली. परंतु, हे खरे नाही. लिंगायत समाज हा महात्मा बसवेश्वर यांच्या आधीपासून अस्तित्वात होता, याचे सबळ पुरावे खुद्द बसवण्णा आणि शिवयोगी सिद्धाराम यांच्या वचनांमध्येच ठायी ठायी आढळतात. बसवेश्वरादी शिवशरण समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन समाजात धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांवर प्रहार केले. प्रबोधनासाठी वचनसाहित्य निर्माण केले. त्यातील ठरावीक वचनांचा संदर्भ तोडून सोयीचा अर्थ लावत बसवण्णांना धर्मसंस्थापक ठरवण्याचा प्रयत्न स्वतंत्र धर्माची मागणी करणारे करताना दिसतात.
बसवण्णांनी जातीभेदासारख्या प्रथांना नाकारले. ‘प्रसंगी वेदांना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना साखळदंड लावेन, आगमांचे नाक कापेन' अशी भूमिका घेतली. अशा वचनांवरून त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना केली असे म्हणणे म्हणजे
‘तरुणांनो, गीता वाचण्यापेक्षा मैदानावर जाऊन फुटबाॅल खेळा' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले म्हणून ते भगवदगीतेचे विरोधक होते असे म्हणण्यासारखे होईल. बसवण्णांच्या सर्व वचनांचा एकत्रित अभ्यास केला तर कोणाच्याही सहज ध्यानात येईल की त्यांनी त्या काळी उपनिषदांतली शाश्वत तत्त्वे लोकभाषेत आणली.
लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी करणाऱ्यांचे एक प्रमुख म्हणणे असते की, ‘लिंगायत धर्म पुनर्जन्म आणि कर्म सिद्धांत मानत नाही म्हणून तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे.’ परंतु, वस्तुस्थिती तशी नाही. लिंगायत समाज हा कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म दोन्ही मानतो. लिंगायतांमध्ये समाधिक्रिया करतानाच्या वेळी करण्यात येणारा विधी हाच सर्वात मोठा पुरावा आहे. (वीरशैव लिंगायतांमधे मृत्युनंतर *दफन* करीत नाहीत तर *समाधिक्रिया* केली जाते. दफन म्हणजे शवपेटीत झोपलेल्या अवस्थेत पुरणे. समाधिक्रिया म्हणजे संतपुरुषाप्रमाणे आसनमांडी घालून ध्यानस्थ अवस्थेमध्ये पुरणे. दफन अाणि समाधी यांमधील हा फरक लक्षात घ्यावा.)
‘अनेक जन्मानंतर हा मनुष्यजन्म मिळाला, आम्ही शिवाचे उपासक असल्यामुळे आता पुन्हा जन्म नाही.’ हा अाशय व्यक्त करणारा विधी अंत्यसंस्कार प्रसंगी असतो. याचा अर्थ पुनर्जन्म सिद्धांत नाकारला असा होत नाही.
महात्मा बसवेश्वरांनी स्थापलेल्या अनुभव मंटपाचे प्रमुख राहिलेले बसवण्णांचे समकालीन शिवशरण म्हणजे शिवयोगी सिद्धराम. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. त्यातील ३ हजार वचने आजही उपलब्ध आहेत. त्यातील एक वचन पुढीलप्रमाणे... ‘इन्नु निम्म शरणुवोक्के नागि, ना निम्मनेंदू ...’ भावार्थ : अनेक वेळा जन्म घेऊनही मी आपले खरे स्वरूप समजून न घेता माझे जीवन व्यर्थ घालवले. आता मी तुम्हाला शरण आलो आहे... हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना मला कर्मबंधनातून मुक्त करावे, ही एकच मागणी आहे.
शिवयोगी सिद्धराम आणि बसवण्णा यांच्या वचनांमध्ये हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे प्रतिपादित करणारी शेकडो उदाहरणे आहेत. ईश्वर एक आहे आणि तो सर्वव्यापी आहे. चराचरात ईश्वर व्यापून आहे. त्यामुळे जातीभेद आदी बाबी अज्ञान प्रदर्शित करणाऱ्या आहेत हा या शिवशरणांच्या वचनांचा सार आहे. कुडलसंगमदेव आणि कपिलसिद्ध मल्लिकार्जुन यांच्यावरील अनन्य भक्ती प्रत्येक वचनांतून झळकते. योगशास्त्र, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी महाकाव्यातील अनेक संदर्भ या वचनांमध्ये विपुल प्रमाणात आहेत.
आपल्या गळ्यात लिंग धारण करतो तो लिंगायत असे ढोबळपणे सांगितले जाते. लिंगायताने गळ्यात शिवलिंग धारण करावे, अशी अपेक्षा असते. परंतु, प्रत्येक लिंगायत लिंग धारण करतोच अशी आजची स्थिती नाही. शुद्ध आचरण असेल तर लिंग धारण केले नाही तरी चालते आणि अशुद्ध आचरण असणाऱ्याने लिंगधारण केले तरी उपयोग नाही, इतके स्पष्ट विचार सिद्धरामांच्या वचनांतून पाहायला मिळतात.
हिंदू धर्मात आगम आणि निगम यांचे स्थान मोलाचे मानले जाते. पारमेश्वरागम पटल १ मधील श्लोक ५८ पुढील प्रमाणे आहे... ‘ब्राह्मणः, क्षत्रिया, वैश्याः, शूद्रा येच अन्यजातयः | लिंगधारणमात्रेण शिवएव न संशयः।।’ भावार्थ : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अथवा अन्य कोणत्याही जातीचा असला तरी लिंगधारण केल्यानंतर तो शिवच समजावा यात संशय नाही. या आशयाचे अनेक श्लोक आगमामध्ये आहेत.
लिंगधारण, स्त्री-पुरुष समानता, वर्णजातिभेद संपवणे ही या आगामांतील शिकवण आहे जी वीरशैव संप्रदायासाठी सांगितलेली आहे. बाराव्या शतकादरम्यान वीरशैव संप्रदायाला ग्लानी आली होती. महात्मा बसवेश्वरांनी हेच विचार लोकभाषेतून मांडले. लिंगायत समाजात नवचैतन्य आणले. त्यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन केलेला नसून "मी शैव होतो वीरशैव झालो’ असे स्पष्ट सांगितले आहे.
थोडक्यात, लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली की अल्पसंख्याक म्हणून आरक्षणाचे लाभ मिळतील, असे आमिष दाखवल्याने अनेकांचा बुद्धिभेद झाला आहे. लिंगायतांमधील काही शिक्षणसंस्थाचालक आदींना वाटते की एकदा नवीन धर्माची मान्यता मिळाली की अल्पसंख्याक म्हणून बरेच काही पदरात पाडून घेता येईल. सोशल मीडियावरील चर्चेकडे पाहिले की ध्यानात येते की, हिंदू धर्माचा द्वेष करणाऱ्या काही संस्था, संघटना स्वतंत्र लिंगायत धर्म मागणीचे जोरदार समर्थन करत आहेत. लिंगायत धर्म समर्थकांना लिंगायतांबद्दल फार प्रेम आहे असे नसून हिंदू धर्माचे तुकडे पडतात याचा त्यांना अधिक आनंद आहे. या शक्ती गेल्या दोन-तीन दशकांपासून लिंगायतांमधील काही मंडळींना हाताशी धरून स्वतंत्र धर्मासाठी प्रयत्न करत आहेत.
यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लिंगायत समाजात मान्यता असलेल्या केदार, काशी, उज्जैन, रंभापुरी आणि श्रीशैलम् या पाचही धर्मपीठाच्या शिवाचार्यांनी लिंगायत हे हिंदूच आहेत असे सांगितले आहे. आता या विषयाला राजकीय वळण मिळाल्यामुळे पुढील काळात यावर चर्चा होत राहील. यामुळे लिंगायत समाजात दोन तट पडून समाज विभागला जाईल की समाज एकसंध राहून राजकीय नेत्यांना दूर सारेल हे समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागेल.
00
बसवेश्वर हे धर्मसुधारक, संस्थापक नव्हे
सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि बसव वाङमयाचे अभ्यासक डाॅ. ईरेश स्वामी म्हणतात, वीरशैव धर्म महात्मा बसवेश्वरांच्या आधीपासून आहे. स्वत: बसवेश्वरांनी जातवेद मुनींकडून दीक्षा घेतली, असा उल्लेख आहे. खुद्द बसवेश्वरांनी सांगितले आहे, की आचरणाच्या दृष्टीने सर्वसामान्यांना कळेल असे वचन साहित्य माझ्या आधी होऊन गेलेल्या कवींनी सांगितले आहे. बसवेश्वर हे धर्म सुधारक होते, धर्म संस्थापक नव्हते.
(हा लेख दैनिक दिव्य मराठीत ५ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी