Tuesday, May 10, 2022

ओळख वंदे मातरम् रचेत्या ऋषी लेखकाच्या चरित्राची / ऋषी बंकिमचंद्र

 

ऋषी बंकिमचंद्र
पाच पिढ्या लोटल्या. बंकिमचंद्रांबद्दल दोन ओळींचीच माहिती पुढे आली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीतील हे गीत आहे.. या त्या दोन ओळी. गेल्या 128 वर्षांत मराठी भाषेत एकही चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला नाही.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा - वंदे मातरम्च्या रचेत्याचे प्रेरक चरित्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करायचे जटायु अक्षरसेवाने ठरवले. ऋषी बंकिमचंद्र या नावाने ते प्रकाशित होत आहे. वंदे मातरम् आणि बंकिमचंद्र यांच्यावर दोन तपाहून अधिक काळ अभ्यास करणारे तपस्वी लेखक मिलिंद सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे चरित्रग्रंथ साकार झाले आहे. या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा लेख येथे सादर आहे.


ग्रंथाचे नाव    : ऋषी बंकिमचंद्र
लेखक    : मिलिंद सबनीस
प्रकाशक     : जटायु अक्षरसेवा
पृष्ठे    : सुमारे 240
मूल्य    : 599/-
सवलत मूल्यात घरपोच मागवा    : 499/-
संपर्क    : 9767284038
UPI    : jataa108@uboi


एका अलौकिक स्फुरणाचे स्मरण


सुमारे बाराशे वर्षांच्या चिवट संघर्षानंतर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण साजरा करत आहोत. यानिमित्ताने त्या हजार-बाराशे वर्षांमध्ये भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणार्‍या हजारो वीरांचे, योद्ध्यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या अनुषंगाने ‘जटायु अक्षरसेवा’ या प्रकाशन संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेले वंदे मातरमचे उद्गाते, आनंदमठकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला केलेले हे अनोखे अभिवादन आहे, असे म्हटले पाहिजे. याबद्दल  या चरित्रग्रंथाच्या निर्मितीत पुढाकार घेतलेले सिद्धाराम पाटील आणि मिलिंद सबनीस यांचे हार्दिक अभिनंदन.

या उपक्रमाला अनोखे अभिवादन म्हणण्याची अनेक कारणे आहेत. 
सर्वात पहिले म्हणजे बंकिमचंद्र यांचे मराठीत प्रसिद्ध होत असलेले हे पहिलेच चरित्र आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे बंकिमचंद्रांना लेखकाने सहर्ष आणि साभिमान प्रदान केलेली ‘ऋषी’ ही श्रेष्ठ उपाधी! बंकिमचंद्रांना राष्ट्र निर्माता आणि ऋषी या दोन विशेषणांनी गौरव केला तो महर्षी अरविंद यांनी! त्यासंदर्भात योगी अरविंदांनी ऋषी या संज्ञेची केलेली मीमांसा सबनीस यांनी आवर्जून या पुस्तकात नमूद केली आहे. अनोखेपणाचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच या पुस्तकातील मांडणीचा आशय आणि त्याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देखण्या चरित्राचे उलगडलेले विविध विलोभनीय पैलू!

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अत्यंत प्रत्ययकारी कविता लिहिणार्‍या शालेय वयातील बंकिमचे साहित्यगुण त्यांचे गुरू, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक ईश्वरचंद्र गुप्त यांनी ओळखले आणि त्यांनीच त्याला पद्याबरोबरच गद्य लेखनही सुरू कर, असा सल्ला दिला. गुरूच्या संदेशाशी बंकिमचंद्रांच्या लेखणीने पूर्ण इमान राखले. इतके की, ‘आधुनिक कादंबरीचे जनक’ असे अजरामर स्थानच तिने बंकिमचंद्रांना प्राप्त करून दिले. कादंबरी शिवाय कथा, विनोदी लेख, विज्ञान, टीकात्मक लेख, निबंध, ललित लेख असे गद्य वाङ्मयाचे जवळजवळ सर्व प्रकार बंकिमचंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले. दोन पृष्ठांच्या निबंधापासून ते 434 पृष्ठांच्या महाकादंबरीपर्यंत विविध आकाराच्या विस्ताराचे त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि प्रत्ययकारी असे. ‘बंगदर्शन’सारखे साहित्यिक नियतकालिक अत्यंत समृद्ध स्वरूपात सादर करून त्यांनी आपले संपादकीय नैपुण्यही अधोरेखित केले.

सामान्यतः कथा, कादंबरी, ललितलेख यासारखे साहित्य रंजनप्रधान आणि लोकप्रियतेचा अनुनय करणारे आढळते. मात्र बंकिमचंद्र यांच्या कादंबर्‍या विविध साहित्य रसांचा उत्तम परिपोष करतात आणि त्याचबरोबर प्रबोधन, सामाजिकता आणि राष्ट्रीयता यांचे जागरण, पराक्रम-वीरता यांचे संवर्धन, धर्माचा आधुनिक विचार-प्रसार तसेच जेत्यांनी लिहिलेल्या भ्रामक इतिहासाचा पर्दाफाश... यासारख्या राष्ट्रप्रेमी सामाजिकतेचेही संवर्धन करतात.

दुर्गेश नंदिनी या पहिल्या कादंबरीपासून कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आदी सर्व कादंबर्‍यांचे अत्यंत धावते परंतु समर्पक रसग्रहण करीत मिलिंद सबनीस यांनी बंकिमचंद्र यांच्या लेखणीचे हे विशेष सोदाहरण उलगडून दाखवले आहेत. आर्य चाणक्याने जागवलेल्या एकराष्ट्रीयतेच्या प्रेरणेशी साधर्म्य दर्शवणारे, जवळीक साधणारे लेखन बंकिमदांनी केले असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण मिलिंद सबनीस यांनी नोंदवले आहे.

बंकिमचंद्रांनी इंग्रजी प्रशासनाची चाकरी पत्करली हे खरे; परंतु आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रभावना तसेच तिचा आपल्या साहित्यातून प्रसार यांच्याआड ती नोकरी येऊ दिली नाही. तसेच नोकरीच्या माध्यमातून आलेली न्यायदानाची जबाबदारी निष्ठेने पार पाडताना ब्रिटीश अधिकार्‍यांना दंड, शिक्षा फर्मावतानाही कोणत्याही दडपणाचा दबाव बाळगला नाही. यामुळे अधिकार्‍यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु त्यांच्या कठोर कर्तव्यदक्ष कारभारामुळे आणि प्रतिमेमुळे त्यांच्या नोकरीवर शासनाकडून कधीच गदा आली नाही. सतत बदल्यांच्या रूपाने काही प्रमाणात त्याची शिक्षा त्यांना अनुभवावी लागली. पण तीही त्यांनी विनातक्रार सहन केली. मात्र आपला न्यायनिष्ठेचा बाणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या समतोलाचेही उत्कृष्ट वर्णन मिलिंद सबनीस यांनी केले आहे.

उपासकाच्या रूपात बंकिमचंद्र हे विष्णूभक्त-वैष्णव होते. परंतु विष्णूची आराधना करतानाही त्यांनी दुष्टांचे निर्दालन आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी कर्मयोगाचा संदेश देणार्‍या विष्णू रूपाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘आनंदमठ’मधील संन्यासी संतान (संथाळ) वैष्णवधर्मीच आहेत. या संतांनांच्या उठावाचे नेतृत्व करणारे वृद्ध संन्यासी सत्यानंद यांच्या तोंडी बंकिमदांनी अर्थपूर्ण वक्तव्याद्वारे वैष्णव धर्माचे उत्तम विश्लेषण मांडले आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात, “खर्‍या वैष्णव धर्माचे लक्षण म्हणजे दुष्टांचे निर्दालन आणि या धरणीमातेचा उद्धार! कारण जगाचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याने दहा अवतार घेऊन या जगाचा उद्धार केला. केसरी, हिरण्यकश्यपू, मधुकैटभ इत्यादी दैत्यांचा नाश त्यानेच केला. रावण, कंस आदी राक्षसांना त्यांनीच मारले. तोच जेता आणि पृथ्वीचा उद्धारकर्ता आणि तोच आहे संतानांचे इष्टदेवता... संतानांचा विष्णू केवळ शक्तीरूपी आहे...”

‘आनंदमठ’च्या माध्यमातून बंकिमदांनी एका बाजूने शक्तीच्या उपासनेचा आणि त्या शक्तीच्या अधिष्ठानावर इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या चळवळीची प्रेरणा जागविली, तर दुसर्‍या बाजूने त्या चळवळीला सात्विक सामर्थ्य प्रदान करणारा ‘वंदे मातरम्’ हा पंचाक्षरी मंत्र उजागर केला. स्वाभाविकपणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रकथेचा सर्वात मोठा भाग ‘वंदे मातरम्’ने व्यापला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सारी इमारतच मुळी वंदे मातरमच्या भक्कम पायावर उभी राहिली आणि यशस्वी फलनिष्पत्तीकडे गेली.

वंदे मातरम् या गीताने काय काय आणि कोणा कोणाला प्रेरित केले याची सूची फार मोठी आहे. राष्ट्रयोगी महर्षी अरविंद, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेकानेक क्रांतीकारक यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत वंदे मातरमने प्रज्वलित केली. 1902 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या घरी झालेल्या एका देशभक्त समूहाच्या बैठकीत ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. योगी अरविंद घोष या बैठकीला उपस्थित होते. या संघटनेच्या नावातील ‘अनुशीलन’ या शब्दाचा स्वीकार बंकिमचंद्र यांच्या लेखातल्या शीर्षकातूनच केला गेला होता.

दक्षिणेचे वासुदेव बळवंत फडके म्हणून ओळखले जाणारे अल्लुरी सीताराम राजू या आदिवासी लढवय्या क्रांतीकारकांनी आनंदमठ वाचूनच संन्यास ग्रहण केला आणि ब्रिटीशांचे राज्य उलथवण्यासाठी सशस्त्र चळवळ हाती घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरू गुरूदास बॅनर्जी यांनी बंकिमचंद्र यांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असा केला होता. अनुशीलन समितीतर्फे ‘युगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. त्या वृत्तपत्राचे संपादक पद काही काळ स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी भूषवले होते. 1905च्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भगिनी निवेदिता यांनी भारताचा जो ध्वज फडकवला (या ध्वजाची रचना स्वतः निवेदितांनी केले होते), त्यावर मध्यभागी ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे रेखांकित केली होती. त्याआधी ऑगस्ट 1905 मध्ये वंगभंग विरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीची प्रचारसभा कलकत्त्यात झाली. त्यासोबत वंदे मातरमचा उद्घोष उच्च स्वराने केला गेला. वंगभंगविरोधी चळवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे. त्या चळवळीचा मंत्रच मुळी वंदे मातरम हा होता. 1906 मध्ये बारिसाल येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमचा गजर करणार्‍या कार्यकर्त्यांवर इंग्रज पोलिसांनी लाठीहल्ला केला. ब्रिटीश शासनाच्या उरात वंदे मातरम या घोषणेने जणू धडकीच भरली होती.

1906 मध्येच वंगभंगाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या सभेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम् मधोमध अंकित केलेलाच ध्वज फडकवला. एक वर्षानंतर 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी या नात्याने मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जो ध्वज फडकवला त्यावरही ‘वंदे मातरम’ हेच शब्द होते.

एकोणीस वर्षांचा तरणाबांड खुदीराम बोस, लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळ्या झाडणारा तेजस्वी युवक मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहीडी आदी क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा उद्घोष करीतच हौतात्म्य पत्करले. तर चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करणारा सूत्रधार मास्टर सूर्यसेन यांची कथा तर अधिकच रोमांचक आहे. सूर्यसेनदांना फाशी देण्याच्या आदल्या रात्री 12 जानेवारी 1934 रोजी त्यांच्या कोठडीत नेत असताना ते वंदे मातरम्च्या घोषणा देत राहिले. त्यासाठी त्यांना अमानुष मारहाण जेलच्या अधिकार्‍यांनी केली. तरीही त्यांनी गर्जना थांबवली नाही. लाठ्यांच्या प्रहाराचा इतका वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला की, शेवटी ते बेशुद्ध पडले. त्याच बेशुद्धावस्थेत त्यांना फासावर चढवण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम्च्या प्रेरणेबाबतचा हा सारा तपशील अतिशय उद्बोधक रीतीने पुस्तकात नमूद केला आहे. नंदुरबारचा कोवळा किशोर शिरीषकुमार, कनकलता बरुआ ही आसामची बाल वीरांगणा यांनीही वंदे मातरम्च्या गजरातच ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या.

वंदे मातरम् या नावाने वृत्तपत्रसृष्टीला ही भुरळ घातली. या नावाचे पहिले साप्ताहिक बंगालमध्ये सुरू झाले. त्याचे पहिले संपादक बिपिनचंद्र पाल तर नंतरचे अरविंद घोष! 1908 मध्ये पुण्यातून, 1909 मध्ये जिनिव्हा येथून (मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्रजीत सुरू केले), 1914 मध्ये स्वित्झर्लंड येथून, 1920 मध्ये दिल्लीहून (लाला लजपतराय - हिंदीतून) वंदे मातरम् नावाची वृत्तपत्रे निघाली. वंदे मातरम् या शब्दसमुच्चयाचे आणि त्यातून व्यक्त होणार्‍या भावनेचे सामर्थ्य असे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होऊ लागले ते साधारण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून-1902 पासून. मात्र त्या सुप्त आणि सशक्त सामर्थ्याची जाणीव स्वतः बंकिमदांना मात्र त्या आधी किमान पंधरा वर्षांपासूनच स्पष्ट होती. 1890 मध्ये बंकिमचंद्र यांनी आपली कन्या शारदा कुमारीशी बोलताना, ‘एक दिवस तू पाहशील, दहा -वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल. एकटा बंगालच काय, सारा हिंदुस्थान या गीतापासून स्फूर्ती घेईल. सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल...!’ या भाकितानंतर पंधरा वर्षांनी बंकिमदांचे हे शब्द अक्षरशः खरे ठरले.


बंकिमचंद्रांचेे भाचे शचिंद्रनाथ यांना तर त्यांनी म्हटले होते की, ‘माझे बाकी सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हे गीत मात्र शाश्वत ठरेल आणि देशाचे हृदय जिंकेल.’ केवढा प्रचंड आत्मविश्वास हा द्रष्टा लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल व्यक्त करीत होता!

आपल्या जन्मभूमीच्या मातीला माता स्वरूप बहाल करून देशभक्तीला मातृभक्तीचे रूप प्रदान करणारी उदात्तम भावना केवळ आणि केवळ भारतातच सर्वात प्रथम जन्माला आली, हे ऐतिहासिक सत्य आहे. वंदे मातरम् हे त्याच उदात्त भावनेचे स्फुरण आहे. याच स्फुरणाची प्रक्रिया आणि इतिहास अत्यंत मनोवेधक आहे. 1762 ते 1774 या काळात झालेल्या इंग्रज विरोधी संन्यासी-उठावाची पार्श्वभूमी कलकत्त्याच्या जवळच असलेल्या नैहाटी कांटलपाडा या आपल्या जन्मगावीच कार्तिक शुद्ध नवमी  7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्रांना झालेले या बंगाली-संस्कृत मिश्र भाषेतील गीताचे स्फुरण, 1882 मध्ये त्या संन्यासी उठावावरच आधारलेल्या आनंदमठ या दिव्य कादंबरीत त्या गीताचा केलेला समावेश आणि मुख्यतः 1905 पासून वंगभंगाच्या चळवळीपासून थेट आजतागायत या पंचाक्षरी मंत्राने देशभक्त भारतीयांच्या हृदयाचा घेतलेला ठाव... हा सारा रोमहर्षक प्रवास अतिशय सुलभ भाषेत मराठी वाचकांसमोर साकार करणारे मिलिंद सबनीस आणि तो इतिहास पुस्तकरूपाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यापाशी सादर करणारे जटायु अक्षरसेवा हे दोन्ही शतशः अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यास खूप खूप शुभेच्छा!

( ग्रंथ मागवण्यासाठी संपर्क : 9767284038)

- अरुण करमरकर!!!!

jataau.com/shop

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी