संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी काही वर्षे संजीवन समाधी घेतलेले आध्यात्मिक महापुरुष, शिवयोगी सिद्धराम. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेली सोलापूरनगरी (प्राचीन नाव सोन्नलगी) ही त्यांची कर्मभूमी. त्यांनी 68 शिवलिंगांची प्रतिष्ठापना केली. देवळे बांधली, चार हजार लोकांच्या र्शमदानातून तलाव खोदले, गरीब व निरार्शितांसाठी अन्नछत्र सुरू केले. सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. महात्मा बसवेश्वर यांचे समकालीन असलेले सिद्धराम समाजसुधारक, योगी तसेच एक संवेदनशील भावकवीही होते. अलौकिक कार्यामुळे ते सोलापूरचे ग्रामदैवत बनले. सिद्धेश्वर आणि सिद्धरामेश्वर ही नावे रूढ होऊन त्यांना ईश्वररूप मानले गेले. कोणत्याही महापुरुषाला ईश्वर मानले की, केवळ त्या महापुरुषाचा जयजयकार करून आपली जबाबदारी झटकण्याची प्रवृत्ती समाजात असते. शिवयोगी सिद्धराम यांनी समाजाची ही मानसिकता जाणली होती, म्हणूनच त्यांनी जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये आपल्यासमोर ठेवली. त्यांनी कन्नड भाषेतून 68 हजार वचनांची निर्मिती केली; परंतु त्यातील 1300 वचनेच उपलब्ध आहेत. त्यांच्या या वचनांतून शिवभक्ती डोकावते व तत्त्वचिंतनाचेही दर्शन घडते. वेद आणि उपनिषदे यातील चिरंतन तत्त्वज्ञान व्यक्त होते. संस्कृत आणि गणित यावर त्यांचे प्रभुत्व असल्याचे वचनांमधून प्रत्ययाला येते.
0 सिद्धाराम पाटील, सोलापूर
साभार - दिव्य मराठी
No comments:
Post a Comment