भारताच्या दक्षिण टोकावर कन्याकुमारीच्या
समोर तीन सागरांच्या संगमावर असलेल्या एका विशाल शिलाखंडावर उभे असलेले
भव्य विवेकानंद शिला स्मारक राष्ट्रीय एकतेचे पवित्र तीर्थस्थान बनले आहे.
विश्वगुरू स्वामी विवेकानंदांचे १९६३ ला त्यांच्या जन्मशताब्दीला उभारलेले
हे स्मारक भारताचेच नव्हे, तर सर्व जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे.
२ सप्टेंबर १९७० ला शिला स्मारकाचे
विधिवत उद्घाटन झाले. तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी
तामिलनाडूचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या
समारंभात याचे उद्घाटन केले. ६ वर्षांच्या कालखंडात समुद्रकिनार्यावर
कारागीरांनी तयार केलेले विशाल दगड सुमारे ७३ हजार होते. २५० कारागीरांनी
रात्रंदिवस खपून २०८१ दिवसात तयार केलेले हे प्रस्तर शिलेवर समुद्रातून कसे
नेले असतील, याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
१८८६ मध्ये ठाकूरांच्या म्हणजे गुरुदेव
रामकृष्णांच्या महानिर्वाणानंतर २३ वर्षांचे नरेंद्र आपल्या ११ गुरूबंधूंसह
वराहनगरच्या पडक्या घरात ६ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर भारतभर
समाजनिरीक्षण व धर्मजागरणासाठी निघाले. तत्पूर्वीच सर्वांनी संन्यासी बनून
नवी नावे धारण केली. त्याचवेळी नरेन्द्र हे विवेकानंद बनले.
आपल्या भारतभ्रमणात विवेकानंद भारतातील
दारिद्र्य, अज्ञान, जातिभेद, अस्पृश्यता, स्वार्थ, अंधविश्वास, क्षुद्र
स्पर्धा आदी दोष पाहून कासावीस झाले. आपल्या समाजाच्या उद्धारासाठी काय
करावे, याचे चिंतन करीत ते शेवटी कन्याकुमारीला आले. त्यांनी प्रथम देवीचे
दर्शन घेतले. त्यांना काही विशिष्ट साक्षात्कार होताच ते सागर पोहून या
शिलेवर गेले. शिलेवरील देवीच्या पावलांचे दर्शन घेऊन ध्यानमग्न झाले.
भारतमातेचे चित्र त्यांच्या डोळ्यासमोर आले. त्यांच्या मनात भारतामुळे व
आपल्या हिंदू धर्मामुळेच सर्व जगाचा उद्धार करण्याची आकांक्षा निर्माण
झाली. म्हणून सर्व जगावर सनातन धर्माची छाप पाडण्यासाठी लवकरच अमेरिकेत
होणार्या विश्वधर्म संमेलनात सहभागी होण्याचा स्वामींनी संकल्प केला.
देवीच्या पावलांचा व शिलेचा हा प्रभाव असल्याने त्यांना ही प्रेरणा झाली.
त्यामुळे त्याच शिलेवर त्यांचे स्मारक उभारण्याची कल्पना पुढे आली.
१९६३ मध्ये स्वामींच्या जन्मशताब्दी
वर्षात भारतभर सर्वत्र अनेक कार्यक्रम झाले. या वातावरणामुळे राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे तामिळनाडू प्रांताचे प्रांतप्रचारक दत्ताजी डिडोळकर
यांच्या मनात या शिलेवर स्वामीजींचे एक स्मारक उभारावे, ही कल्पना प्रथम
आली. या शिलेचे नाव विवेकानंद शिला म्हणून घोषित करावे व त्यावर त्यांची एक
प्रतिमा स्थापित करावी, हीच त्यांची प्रेरणा. दत्ताजींनी कन्याकुमारीच्या
प्रतिष्ठित नागरिकांची एक स्थानिक समिती बनविली. ही योजना कन्याकुमारीच्या
रामकृष्ण आश्रमाचे प्रमुख स्वामी चिद्भवानंद यांनी मान्य केली. या कल्पनेला
प्रसिद्धी मिळताच तेथील कॅथॉलिक मंडळींनी याला विरोध करून त्या शिलेला
‘सेंट झेवियर शिला’ असे नाव दिले. त्या भागात ख्रिश्चनांची बहुसंख्या आहे.
हिंदूंवर अत्याचार करणार्या चर्चचा क्रॉस तेथे त्यांनी बसविला. काही
संघस्वयंसेवक तो क्रॉस उखडून फेकावयास सिद्ध झाले, पण धर्मांतरित ईसाई
नाविक त्यांना नेण्यास तयार नव्हते म्हणून बालन व लक्ष्मणन् यांच्यासोबत
काही धाडसी स्वयंसेवकांनी रातोरात पोहत जाऊन तो क्रॉस तोडून समुद्रात
फेकला. काही काळ झालेले आंदोलन सरकारने १४४ कलम लावून बंद केले.
तामिळनाडूचे तत्कालीन कॉंग्रेसचे
मुख्यमंत्री भक्तवत्सलम् हे धार्मिक प्रवृत्तीचे व कांची कामकोटीच्या
आचार्य चंद्रशेखरन् सरस्वती यांचे भक्त होते. पण, पक्षस्वार्थामुळे ते
ख्रिश्चनांना नाराज करू इच्छित नव्हते. त्यावर दत्ताजी डिडोळकरांनी उपाय
योजून कन्याकुमारीच्या नागरिकांची समिती वाढवून कन्याकुमारी जिल्ह्याची
केली. लगेच नोव्हेंबर १९६२ मध्ये ‘स्वामी विवेकानंद शिलास्मारक, अखिल
भारतीय समिती,’ गठित करून त्या समितीचे अध्यक्ष म्हणून केरळचे नेते मन्मथ
पद्मनाथन यांची नियुक्ती केली गेली. त्या अखिल भारतीय विवेकानंद शिला
स्मारक समितीने घोषणा केली की, ‘१२ जानेवारी १९६३ पासून प्रारंभ होणार्या
विवेकानंद जन्मशताब्दी वर्षाचा समारोप १२ जानेवारी १९६४ ला होईपर्यंत
शिलेवर त्यांची प्रतिमा स्थापन करू.’ त्यासाठी तामिळनाडू सरकारकडे ६ लाख
रुपयांची मागणी करून ती शिला विवेकानंद शिला म्हणून घोषित करण्याची विनंती
केली. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी विवेकानंद शिला म्हणून मान्य केली व
त्यावर प्रतिमा बसविण्यासही मान्यता दिली. पण, स्मारक उभारू नये, असे ते
म्हणाले. पण, स्वामी चिद्भवानंदांच्या आग्रहामुळे १५१५ फुटाच्या
व्यासपीठावर विवेकानंदांची एक ध्यानमुद्रा बसवून ती लोखंडी कठड्यात
सुरक्षित राहील, हे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले.
मुख्यमंत्र्यांच्या या मान्यतेनुसार १७
जानेवारी १९६३ ला शिलेवर एक प्रस्तर पट्टी बसविण्यात आली. पण, १६ मे १९६३
ला अंधार्या रात्री समाजकंटकांनी पट्टिका समुद्रात फेकली.
मुख्यमंत्र्यांच्याही मनातला विरोध व चर्चचाही विरोध यामुळे समिती जरा
विचारात पडली. मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असे की, ‘‘केंद्र सरकारच्या
अनुमतीशिवाय काहीही करू नये.’’ त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काही करू शकत
नाही. आता केंद्राच्या परवानगीची समस्या पुढे आली. अखिल भारतीय दबावाशिवाय
ते शक्य नव्हते. हे काम कोण करू शकेल? सर्वांचे लक्ष सरसंघचालक प. पू.
गुरुजींकडे गेले. त्यांना समितीचे काही जण भेटले. त्यांची विवेकानंदांवर
अगाध श्रद्धा होती. ते तर स्वामी अखंडानंदांचे शिष्यच होते.
मार्च १९६२ मध्ये संघाचे सरकार्यवाह
असलेले एकनाथजी रानडे यांना त्या जबाबदारीतून मुक्त करून अ. भा. बौद्धिक
प्रमुख म्हणून दायित्व देऊन विवेकानंदांच्या शताब्दी वर्षाची योजना करावयास
सांगण्यात आले. बालपणापासून एकनाथजींना विवेकानंदांबद्दल खूप आदर होता. प.
पू. गुरुजींनी हे दायित्व दिल्यावर त्यांना आनंद झाला. चार-पाच महिने
कलकत्त्याच्या बेलूर मठात राहून त्यांनी तेथील संपूर्ण वाङ्मयाचा अभ्यास
त्यांनी केला. विवेकानंदांच्या कार्यावर दोन पुस्तके लिहिली.
१६ मे १९६३ ला लावलेली पट्टिका उद्ध्वस्त
केल्यावर समितीचे काही सदस्य दत्ताजी डिडोळकरांच्या सोबत प. पू.
गुरुजींकडे मार्गदर्शनासाठी आले. या कार्यासाठी सुयोग्य व्यक्ती कोण
द्यावी, या विचारात गुरुजी असताना योगायोगाने एकनाथजीही तेथे आले. त्यांनाच
‘आपण शिलास्मारकाचे दायित्व घ्याल काय?’ हा प्रश्न गुरुजींनी विचारला.
त्या वेळी एकनाथजी स्वत: विवेकानंद वाङ्मयातच समरस होत होेते, तरी वरील
प्रश्नाचे उत्तर त्यांनी ‘होय’ म्हणून दिले. काही चर्चा झाल्यावर ते लगेच
बेलूर मठात आले व या कामासाठी मठाचे अध्यक्ष स्वामी माधवानंद यांना भेटून
त्यांचा आशीर्वाद मागितला. स्वामी एकदम आंनदित झाले व म्हणाले, ‘‘या
पुण्यकार्यासाठी माझाच काय, पण रामकृष्णांचा व विवेकानंदांचाही तुम्हाला
आशीर्वाद आहे.’’ केवढे हे प्रसंगावधान एकनाथजींचे!
बेलूर मठातून एकनाथजी सरळ मद्रासला गेले.
त्यांनी या कामाची सर्व कागदपत्रे पाहिली. त्यावरून त्यांच्या असे लक्षात
आले की, सांस्कृतिक विभागाचे केंद्रीय मंत्री हुमायू कबीर यांचा स्मारकाला
विरोध होता, कारण त्यामुळे तेथील नैसर्गिक सौंदर्य नष्ट होईल, असे त्यांना
वाटले. हे पंडित नेहरूंनाही पटले. म्हणून आपण प्रथम केंद्राची परवानगी
घ्यावी, हे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांना समितीच्या कार्यकारिणीत काही
पद असावे, असे वाटले. म्हणून ते विवेकानंद शिला स्मारक समितीचे संघटन
मंत्री बनले. लगेच त्यांनी हुमायू कबीरची भेट मागितली. ती मंत्र्यांनी
नाकारली.
म्हणून ते पुन्हा बेलूर मठात आले व
त्यांनी स्वामी माधवानंद व मान्यवरांशी चर्चा केली. सर्व बंगाल शिला
स्मारकासाठी अधीर झाला होता. हुमायू कबीर यांचे बंगाल हेच क्षेत्र होते.
त्यामुळे एकनाथजींनी स्वामींच्या साहाय्याने कलकत्त्याच्या सर्व संपादकांना
व पत्रकारांना भेटून स्मारकाला हुमायू कबीरांचा मुख्य विरोध आहे, हे पटवून
दिले. लगेच तेथे पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासमोर हा विषय सविस्तरपणे
प्रारंभापासून मांडला. दुसरेच दिवशी बंगालच्या सर्व वृत्तपत्रांतून ही
बातमी झळकली. हे सर्व वाचून मंत्र्यांनी एकनाथजींना भेटीला येण्याचे
निमंत्रण दिले. गेल्यावर भेटीत दोघांची शांतपणे सविस्तर चर्चा झाली.
स्मारकाचा विषय एकनाथजींनी त्यांना समजावून सांगितला. झालेली चर्चा दोन
प्रतीत लिहून काढून त्यापैकी एक प्रत त्यांना दिली. त्यांच्या स्मरणशक्तीचे
मंत्र्यांनी कौतुक केले. यांची संमती मिळाल्यावर आता पं. नेहरूंची संमती
घेण्याचा विषय सुरू झाला. कारण, त्याशिवाय मुख्यमंत्री भक्तवत्सलम् यांची
संमती मिळणार नव्हती.
या कामासाठी एकनाथजींनी प्रथम लालबहादूर
शास्त्री यांची भेट घेतली. कारण, ते अत्यंत धार्मिक व कर्मयोगी होते आणि
त्यांच्यावर पं. नेहरूंचा खूप विश्वास होता. ‘मी पंडितजींना पटविण्याचे
काम करीन, पण थोडे संथगतीने करावे लागेल?’ असे आश्वासन त्यांनी दिले. काही
दिवस वाट पाहून एकनाथजी पुन्हा शास्त्रीजींना भेटले. ते म्हणाले,
‘‘शास्त्रीजी, लवकर काम व्हावे यासाठी मी काही संसद सदस्यांची या
स्मारकाच्या अनुकूलतेवर स्वाक्षरी घेऊन ते प्रतिवेदन पं. नेहरूंना दिल्यास
काम सुकर होईल काय?’’ ही कल्पना शास्त्रीजींना बरीच आवडली. एकनाथजी त्या
कामाला लागले.
दिनांक २४-२५-२६ डिसेंबरला संसद
अधिवेशनाच्या वेळी दिल्लीला मुक्काम करून, त्यांनी ३२३ संसद सदस्यांच्या
स्वतंत्र भेटी घेऊन शिला स्मारकासाठी अनुकूलतेच्या पत्रकावर त्यांच्या
सह्या घेतल्या. बरेच सदस्य तर स्वामिभक्तच होते. कॉंग्रेस, समाजवादी,
मुस्लिम, ईसाई, कम्युनिस्ट आदी सर्व सदस्यांनी संमतिपत्रावर स्वाक्षरी
केली. या कामात डॉ. राममनोहर लोहिया यांनी बरीच मदत केली. कम्युनिस्ट सदस्य
रेणू चक्रवर्ती यांनी तर ताबडतोब स्वाक्षरी केली.
सर्व हस्ताक्षर संग्रह घेऊन एकनाथजी
शास्त्रीजींकडे गेले. ते पाहून त्यांना एकदम आश्चर्यच वाटले. एक अप्रसिद्ध
व्यक्ती राजकीय नसून सुद्धा हे कसे करू शकली? त्यामुळे ते गमतीने म्हणाले,
‘‘सब हस्ताक्षर सचमुच उन्हीके है ना?’’ यावर एकनाथजी म्हणाले, ‘‘आप किसीको
भी फोन करके पुछ सकते हो.’’ प्रसन्न होऊन शास्त्रीजी म्हणतात, ‘‘अब तुम
निश्चिंत बैठो. अगला काम मै करूंगा.’’ पण, ते निश्चिंत बसणारे नव्हते.
त्यांनी हा हस्ताक्षर संग्रह संसदेचे ज्येष्ठ सदस्य श्री बापूजी अणे
यांच्याद्वारे पं. नेहरूंना दिला. ते पाहून नेहरूंनी लगेच भक्तवत्सलम्
यांना, शिला स्मारकाला आपली संमती कळविली. आता तामिळनाडू सरकारही ५-२-६४ ला
तयार झाले. त्यांनी वृत्तपत्रांतून आपली सहमती ६-२-६४ ला जाहीर करून
प्रतिमा मात्र लहान व सुरक्षित असावी, असे प्रसिद्ध केले. ते वाचून
एकनाथजींनी भक्तवत्सलम् यांची भेट घेऊन मन:पूर्वक आभार मानले.
एकनाथजींच्या डोक्यात मात्र भव्य स्मारक
उभारण्याची कल्पना घोळत होती. मुख्यमंत्र्यांच्यापुढे त्यांनी एक कल्पना
ठेवली. काही विद्वान स्थापत्यकारांना बोलावून त्यांच्याकडून स्मारकाचा
आराखडा तयार करून घ्यावा व पाच प्रमुख नेत्यांची एक समिती नेमून
त्यांच्याशी स्थापत्यकारांनी विचारविनिमय करावा. हे नेते कोण? अशी चौकशी
त्यांनी केल्यावर त्यांना पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, डॉ. राधाकृष्णन्,
महमद करीम छागला, स्वामी माधवानंद आणि परमाचार्य चंद्रशेखरन् ही नावे
सांगितली. स्मारकाचा आराखडा एस. के. अचारी करू लागले. आराखडा तयार झाल्यावर
त्याला चंद्रशेखरन् यांनी मान्यता दिल्यावर मुख्यमंत्र्यांनीही मान्य
केला. याचा आकार तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा होईल, हे त्यांना हळूच
सांगितले. ‘काही चिंता नाही, काम सुरू करा,’ असे भक्तवत्सलम् म्हणाले. १५१५
फुटापासून १३०५६ पर्यंत सभामंडप पोहोचला.
स्मारकाचे क्षेत्र तर क्रमाक्रमाने वाढतच
चालले. प्रत्येक वेळी प्रांतसरकाची अनुमतीही एकनाथजी कौशल्याने घेतच गेले.
सभामंडपासह देवीच्या पादुकांवर श्रीपाद मंडपम् व शिलेच्या गर्भगृहात
ध्यानमंडपम् या कल्पना त्यांच्या डोक्यात आल्या. हे सर्व जर प्रांताकडे
एकदमच दिले असते, तर कठीणच झाले असते. हे सर्व एकनाथजींची योग्यता, अनुभव,
कल्पनाशक्ती व कौशल्य यामुळेच शक्य झाले. त्यांच्या पाठीशी रा. स्व. संघ,
बेलूर मठ व काही धार्मिक पुढारीही होतेच. या सर्वांच्या सहकार्याने शिला
स्मारकाच्या निमित्ताने सर्व समाज उभा झाला.
परवानगीचा घोळ संपल्यानंतर दगडांची निवड,
कुशल स्थापत्य तज्ज्ञ, कारागीर व शिल्पकार, यांची राहाण्याची व पैशाची
व्यवस्था, काम करण्याचे स्थान, शिलेवर जाण्यायेण्याची हुकमी साधने,
कोट्यवधीचा लागणारा खर्च उभा करणे, या सर्व मोर्चावर त्यांना कार्यारंभ
करावा लागला. दगडांची निवड होऊन कुशल कारागीर व चित्रकारही मिळाले. काम
करण्यासाठी विवेकानंदपुरम्ची विस्तीर्ण जागा मिळाली.
स्मारकाच्या खर्चाचा आराखडा (बजेट) ४०
हजारांचे होते. ते वाढत-वाढत १ कोटी ३५ लाखांपर्यंत गेले. एकनाथजी देणग्या
जमविण्याच्या मागे लागले. प्रथम त्यांनी सर्व प्रांत सरकारकडून देणग्या
प्राप्त केल्या. ते काम सुकर व्हावे म्हणून प्रांत व जिल्हा समित्या तयार
केल्या. सर्व प्रांतांनी एक लाखाच्या वरच देणग्या दिल्या. नागालँड, सिक्कीम
व जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनीही निधी दिला.
कम्युनिस्ट नेते अण्णा दुराई, कल्याण सुंदरम्, यांना तामिळनाडूच्या समितीत
घेतले. महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कॉंग्रेस नेते स. का. पाटील हे झाले.
कम्युनिस्ट पुढारी ज्योती बसू व वासव पुनय्या हे तर शिला स्मारकाचे कामही
पाहून आले व प्रसन्न झाले. उत्तरप्रदेशचे समिती अध्यक्ष चंद्रभानू गुप्ता
हे होते. सर्व प्रांतांकडून भरघोस देणग्या जमविण्याचे काम चालू असतानाच
अनेक मोठमोठ्या उद्योगपतींनाही ते भेटतच होते. म्हैसूर राज्य समितीकडून तर ४
लाख रुपये आले, जुगलकिशोरने तर ५० हजार रुपये दिले. निधीमध्ये सर्व प्रांत
व उद्योगपती यांच्या सोबतच देशातील प्रत्येक व्यक्तीचा यात सहभाग असावा,
ही कल्पना पुढे आली. म्हणून विवेकानंदांचे चित्र व स्मारकाची संक्षिप्त
कल्पना असलेले एक पोस्टकार्डाच्या आकाराचे कुपन तयार केले. त्याच्या लाखो
प्रती छापल्या. देशातील प्रत्येक व्यक्तीला ते कुपन देऊन १, १ रु. फक्त जमा
करावा, ही योजना ठरली. ही योजना रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी भारतभर
अमलात आणून देशातून त्यात ८५ लाख रुपये जमले. त्यात महाराष्ट्राचे २१ लाख
रुपये होते.
हे सर्व सुव्यवस्थितपणे सुरू असतानाच
मध्येच एक उत्तर-दक्षिण वादाचा विरोध उपस्थित झाला. तो म्हणजे ‘त्याच
शिलाखंडावर दक्षिणेतील प्रसिद्ध संत तिरुवल्लुवर यांचाही पुतळा बसवावा.’
बर्याच जणांनी हा विषय उचलून धरला. तामिळनाडूचे द्रमुक नेते करुणानिधी
उत्तम कलाकार होते. त्यांना शिलेवर नेऊन सर्व पाहणी करावयास लावली. त्यांनी
सूक्ष्म अवलोकन केल्यावर निर्णय दिला की, ‘‘या शिलेवर ठरल्याप्रमाणे
स्वामी विवेकानंदांचाच पुतळा राहील. येथे दुसरा उभारणे शक्य नाही. तो पुतळा
दुसर्या कोणत्या स्थानी उभारू.’’ या प्रकारे शेवटचा विरोध आटोपला.
सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर व
सर्वांच्या अथक परिश्रमानंतर सर्व अडचणींवर शांतपणे आणि कौशल्याने मात करून
दिनांक २ सप्टेंबर १९७० ला त्या वेळचे मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या
अध्यक्षतेखाली व राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या उपस्थितीत अति भव्य
स्वरूपात कार्यक्रम पार पडला. कन्याकुमारी गाव केवळ ७००० लोकसंख्येचे.
उद्घाटनाला भारतातून तेथे लक्षावधी लोकांची येण्याची इच्छा होती. पण, ती
व्यवस्था करणे शक्य नव्हते, म्हणून त्या वेळी केवळ प्रमुख निमंत्रितच होते.
ती संख्याही काही हजार होती. म्हणून हा समारंभ २ महिने चालू ठेवण्यात आला.
प्रत्येक प्रांताने कोणत्या दिवसात यावे, याचीही योजना होती.
या ७ वर्षांत एकनाथजी कोणाकोणाशी भेटले,
काय चर्चा झाली, कोणाशी पत्रव्यवहार झाला व येणार्या अडचणी कशा निस्तरल्या
गेल्या आणि कोणाकोणाचे सहकार्य झाले, याचे सर्व लिखित वृत्त त्यांनी
प्रत्येक क्षणीच तयार करून ठेवले होते. त्याच्या आधारावर एक संपादक मंडळ
नेमून त्या संकलनाची एकेक प्रत त्यांना देऊन एक प्रत कार्यालयात ठेवण्यात
आली. त्याच्या आधारावर ‘विश्व संस्कृती एवं चिंतनको भारतका योगदान,’ असा
स्मृतिग्रंथ उद्घाटनाच्या दिवशीच प्रकाशित केला गेला.
आतापर्यंत तर कोट्यवधी लोकांनी शिला
स्मारकाचे दर्शन घेतले व घेतही आहेत. विवेकानंदपुरम्मध्ये काही इमारती,
सभागृह, कार्यालय, वृक्षारोपण, बगीचा क्रमश: तयार केल्या गेले. सेवकांची व
येणार्यांची निवासव्यवस्थाही झाली. लगतच्याच समुद्रकिनार्यावर एकनाथजींचा
पुतळाही पुढे उभारण्यात आला. शिलेवर जाण्याची व्यवस्था व तेथील सेवकांची
योजनाही झाली. केवळ स्मारक उभारणे हेच एकनाथजींचे लक्ष्य नव्हते, तर शिला
स्मारक समितीच्या माध्यमातून भारतातील सेवावस्त्या व वनवासी भागात जाऊन
अनेक प्रकारची सेवाकार्ये, त्यांचा विकास, ही कल्पना होती. त्यासाठी
त्यांनी विविध प्रांतांतील अनेक युवक-युवतींची निवड करून
विवेकानंदपुरम्मध्ये काही महिने त्यांची शिबिरे घेऊन त्यांना याची पूर्ण
कल्पना देऊन, संस्कारित करून काही भागात पाठविणे सुरू केले. त्यांना
जीवनव्रती म्हणतात. कारण, हे कार्य आजीवन करण्याचा त्यांचा संकल्प असतो. आज
असे शेकडो जीवनव्रती देशात ठिकठिकाणी काम करीत आहेत. अरुणाचलसारख्या
दुर्गम भागातही विद्यालये, संस्कार केंद्रे, रुग्णालये, मठ-मंदिरे, धार्मिक
उत्सव हे कार्यक्रम चालतात. प्रारंभापासून जीवनव्रती असलेल्या निवेदिता
भिडे या स्मारक समितीच्या सध्या उपाध्यक्षा आहेत. असे उभारल्या गेले
विवेकानंद शिलास्मारक.
रघुनाथ आंबुलकर
९४२३१०१७९९
tarun bharat
No comments:
Post a Comment