Wednesday, August 22, 2012

मुसलमानांनीच स्वत:ला सांभाळावे; गुंडांना आवरावे

-मा. गो. वैद्य // रविवारचे भाष्य दि. १९ ऑगस्ट २०१२ करिता
गेल्या ११ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर रजा ऍकॅडेमीनावाच्या मुस्लिम संस्थेने एका निषेध सभेचे आयोजन केले होते. आसाम आणि म्यांमार येथे मुसलमानांवर जे तथाकथित अत्याचार करण्यात आले, त्यांचा निषेध करण्यासाठी ही सभा म्हणा, धरणे आंदोलन म्हणा, होते. यासाठी या संस्थेने सरकारची परवानगी घेतली होती; आणि सुमारे हजार-दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे निवेदन केले होते. परंतु, प्रत्यक्षात तेथे पंधरा हजारावर मुसलमानांची भीड जमली आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात हिंसाचार केला. त्यांचे मुख्य आघातलक्ष्य पोलिस व प्रसारमाध्यमे असावे, असे दिसून आले. या हिंसाचारात, सरकारी आकड्यानुसार २ ठार झाले, तर ५४ लोक जखमी झाले. त्या ५४ मध्ये ४५ पोलिस कर्मचारी होते. त्यांनी दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांची वाहने तर जाळलीच, पण अनेक छायाचित्रकारांना मारहाण करून त्यांचे कॅमेरेही फोडले. पोलिसांच्या गाड्यांनाही त्यांनी आगी लावल्या. बसेसचीही मोडतोड केली. अर्थात् खाजगी वाहनेही त्यांच्या हिंसाचारातून सुटली नाहीतच.
हिंसाचाराचे कारण
मुसलमान असे आणि इतके भडकण्याचे कारण काय? ज्या हिंसाचारात मुसलमानांची अधिक हानी झाली, तो म्यांमारमध्ये व सुदूर आसामात घडला होता. म्यांमारमध्ये बौद्ध लोकांची बहुसंख्या आहे. ते ८९ टक्के आहेत. मुसलमान फक्त ४ किंवा ५ टक्के. एका मुसलमानाने एका बौद्ध मुलीवर बलात्कार केला आणि म्हणून तेथील बौद्धांनी मुसलमानांना मारहाण केली. म्यांमारमधील घटनांचा अधिक तपशील भारतीय वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित किंवा प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित केला गेला नाही. याचा अर्थ, तो फार गंभीर असण्याची शक्यता वाटत नाही. आसामच्या कोक्राझार आणि चिरांग या दोन जिल्ह्यांमध्ये बोडो जनजातीचे लोक आणि बांगला देशातून आलेले मुस्लिम घुसखोर यांच्यात संघर्ष झाला. आता, असे प्रकाशित झाले आहे की, या संघर्षात स्थानिक मुसलमानांचेही बरेच नुकसान झाले आहे.
आगळीक मुसलमानांचीच
या दोन्ही ठिकाणच्या संघर्षात मुसलमानांना अधिक मार खावा लागला, असे दिसते. एरवी आपल्या सेक्युलरदेशाचे प्रधानमंत्री व गृहमंत्री धावत आसामात पोचलेच नसते. म्यांमारमध्ये ते जाणे शक्यच नव्हते. कारण तो आपल्या भारताचा भाग नाही आणि बहुधा तेथे आपल्या येथे विकृत सेक्युलॅरिझमचा जो थयथयाट चालू असतो, त्यापासून तेथील जनता मुक्त असावी. हेही येथे लक्षात घेतले पाहिजे की, आगळीक प्रथम मुसलमानांच्या हातून घडली. म्यांमारमध्येही आणि कोक्राझारमध्येही. आसामच्या कोक्राझार जिल्ह्यात प्रथम स्थानिक बोडो जमातीच्या चार युवकांचा मुसलमानांनी खून केला. पण, एवढ्यावर ते समाधानी नव्हते. त्यांनी गुण्यागोविंदाने शेजारी राहत असलेल्या बोडोंच्या घरांनाही पेटविणे सुरू केले. याची नंतर खूपच तिखट प्रतिक्रिया बोडोंकडून प्रकट झाली. त्यांनी जशास तसे प्रखर उत्तर दिले. लक्षावधी मुसलमान बेघर झाले. बोडोंचेही नुकसान झाले. निर्वासित शिबिरांमध्ये त्यांचीही संख्या लाखात मोजण्याइतकी आहे. या संबंधीचा अधिक तपशील दि. ५ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित झालेल्या याच स्तंभात आलेला आहे. त्यामुळे, त्याची पुनरावृत्ती येथे करीत नाही.
नकारात्मक परिणाम
सामान्यत:, मुसलमानांकरवी प्रारंभ होणार्‍या हिंसाचारात त्यांच्या विरोधकांची हानी अधिक होत असते. कारण, ते योजनेने आक्रमण करीत असतात म्हणून त्यांना आपली आघातलक्ष्ये अगोदर ठरविता येतात. जेव्हा प्रतिकार सुरू होतो, तेव्हा बरेच काही घडून गेले असते आणि मग पोलिस व अन्य सुरक्षादले तेथे उपस्थित होत असल्यामुळे हिंसाचार आटोक्यात आणला जातो. कोक्राझार व शेजारच्या चिरांग जिल्ह्यांमध्ये असे घडले नाही. आता तेथे पोलिस व राखीव सुरक्षा दले उपस्थित असतानाही हिंसाचार पूर्णत: थांबलेला नाही. लोक अजून निर्वासित छावण्यांमध्ये आहेत. शेजारी राहणार्‍या मुसलमानांची कृतघ्नता अनुभवली असल्यामुळे, बोडो त्यांना आता आपल्या शेजारी राहू देण्यासही तयार नाहीत.
परिवर्तनाची संधी
परंतु प्रश्‍न असा की, आसाम किंवा म्यांमारमधील घटनांची हिंसक प्रतिक्रिया मुंबईतील मुसलमानांतच का प्रकट व्हावी? मुसलमानांवर कुठेही अत्याचारवा अन्यायहोवो, जगातील मुसलमानांना क्रोध येतो, अशी एक समजूत आहे. मग गोहाटीत, कलकत्त्यात, पाटण्यात, लखनौत, दिल्लीत त्याची प्रतिक्रिया का उमटली नाही? (आता एक आठवड्यानंतर लखनौ व अलाहाबादमध्येही मुसलमानांनी हिंसक आंदोलने केल्याचे वृत्त आहे.) मुंबईपेक्षा ही सर्व बडी शहरे, कोक्राझारपासून म्हणा अथवा आसामपासून म्हणा जवळ आहेत. या शहरांमध्ये काही घडू नये आणि सुदूर मुंबईत ते घडावे, याचे कारण काय? ‘रजा ऍकॅडेमीसारख्या मुसलमानांच्या संस्था तर त्याही शहरात असतीलच. मला खात्री आहे की ज्या म्यांमार देशातील घटनांच्या निषेधार्थ मुंबईत अकांडतांडव घडले, तो देश कुठे आहे, हेही, मुंबईत, पोलिसांच्या गाड्या पेटविणार्‍या, महिला पोलिसांशी दुर्व्यवहार करणार्‍या आणि जनतेची वाहने जाळणार्‍या नराधमांना माहीत नसणार. म्यांमारचे जाऊ द्या. कोक्राझारही कुठे आहे, तेही ती हिंसक जमात सांगू शकायची नाही. याचा निष्कर्ष एकच निघतो की, मुंबईतील हिंसाचार पूर्वनियोजित होता. एक वेळ आपण हे मानू की, ‘रजा ऍकॅडेमीने तो ठरविलेला नव्हता. पण त्या संस्थेला या काही प्रश्‍नांची उत्तरे द्यावीच लागतील की, त्यांच्या व्यासपीठावरून आगलावी भाषणे का दिली गेलीत? ऍकॅडेमीच्या धुरीणांनी त्यांना का अडविले नाही? कोक्राझार व म्यांमार येथे मुसलमानांवरही अत्याचार झाले, त्यांची चित्रे मुंबईलाच कशी पोचली? आता स्पष्ट झाले आहे की, जी चित्रे दाखवून मुसलमानांच्या जमावाला चिथावण्यात आले, ती ना कोक्राझारची होती, ना म्यांमारची. ती होती, म्हणतात, २००२ मधल्या गुजरातमधील दंगलींची. हे खरेच आहे की, गुजरातेत तेथील मुसलमानांना जे भोगावे लागले, ते अभूतपूर्व होते. गुजरातेत २००२ पूर्वी अनेकदा दंगे झालेले आहेत. प्रत्येक वेळी आगळीक मुसलमानांकडूनच झालेली होती. २००२ सालीही, मुसलमानांनीच ५७ गुजराती कारसेवकांना, ते प्रवास करीत असलेल्या गाडीच्या डब्याला आग लावून, जिवंत जाळले होते. ज्यांची शामळूअशी ख्याती आहे, अशा गुजराती हिंदूंमध्ये या प्रकरणाची अशी काही अकल्पित तिखट प्रतिक्रिया उमटली की, तिच्या तीव्रतेची कुणीही कल्पना केली नव्हती.
मुसलमानांचे कर्तव्य
म्हणून, मुसलमानांनी समजून घ्यावे की, गोध्रा असो वा कोक्राझार असो, अथवा म्यांमार असो, त्यांचा आडदांडपणा यापुढे जनता सहन करणार नाही. मुसलमानांनी स्वत:ला सांभाळले पाहिजे. समंजस मुसलमानांची संख्या निश्‍चितच गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्या धर्मबांधवांपेक्षा अधिक आहे. त्यांनी या गुंडप्रवृत्तीच्या लोकांना आवरले पाहिजे. यातच त्यांच्या संपूर्ण समाजाचे हित आहे. कल्पना करा की, मुंबईतील मुसलमान गुंडांचा अकारण हिंसाचार बघून हिंदू चिडले व तेही त्या हिंसाचाराला तसेच प्रत्युत्तर देऊ लागले, तर काय अनर्थ होईल? मला नाही वाटत की, मुंबईतील मुसलमान असे काही चाहत असतील. म्हणून, मुंबईतील हिंसाचाराची खरेच त्यांना लाज वाटत असेल, तर गावोगावच्या मुसलमानांनी शांतिमोर्चे काढून किंवा मूक निदर्शने करून आपल्या समाजातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा निषेध केला पाहिजे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारतातील जे लोक नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त, मुंबई, पुणे, बंगलोर, चेन्नई इ. शहरांमध्ये राहत आहेत, त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिलासा दिला पाहिजे. त्यांना विश्‍वास दिला पाहिजे की आपण घाबरू नये. जे कोणी त्यांना एसएमएस पाठवून वा अन्य रीतीने धमकावीत आहेत, त्यांना मुसलमान समाजाने तसेच उत्तर दिले पाहिजे आणि ईशान्य भारतातील लोकांच्या संरक्षणासाठी आम्ही सज्ज आहोत, असे दाखविले पाहिजे. अन्यथा, या धमकावण्यांना त्यांचीही संमती आहे, असाच निष्कर्ष कुणीही काढील.
पश्‍चिम आशियाचे चित्र
आणि खरे म्हणजे म्यांमार किंवा कोक्राझारमधील जीवितहानीने आणि वित्तहानीने प्रक्षुब्ध होण्याऐवजी भारतीय मुसलमानांनी पश्‍चिम आशियात सध्या जे घडत आहे त्याबद्दल अधिक चिंताग्रस्त असायला हवे. काय घडत आहे पाकिस्तानात किंवा अफगानिस्थानात? अथवा इराकमध्ये? किंवा येमेनमध्ये वा सीरियात? इथे कोण कुणाला ठार करीत आहे? मुसलमानच मुसलमानांना ठार करीत आहेत ना? अगदी ताजी बातमी आहे. गेल्या गुरुवारची म्हणजे १६ ऑगस्टची. दूरच्या म्यांमारमधली नाही. शेजारच्या पाकिस्तानातील. तीन बसेसमध्ये बसून प्रवासी जात होते. त्या बसेस थांबविण्यात आल्या. त्यातील २२ जणांना खाली उतरविण्यात आले. त्यांची झाडाझडती घेण्यात आली. त्यातले १२ शियापंथीय निघाले. त्यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले! कोणता अपराध होता त्यांचा? हाच ना की ते शिया पंथाचे होते! म्हणजे मुसलमानच होते ना! असा कसा तुमचा इस्लामी मजहब, जो आपल्याचमधील एका विशिष्ट पंथीयांना जगण्याचा हक्कही देत नाही? त्याच दिवशी इराकमध्येही तेच घडले. तेथे २२ जणांची हत्या करण्यात आली. ते काफीरनव्हते. मुसलमानच होते. सध्या इराकमध्ये बहुसंख्यीय शिया लोकांची सत्ता चालू आहे. यापूर्वी सद्दाम हुसेन या सुन्नीपंथीय हुकूमशहाची सत्ता होती. इराकमध्ये शियापंथीयांची संख्या ६१ टक्के आहे आणि सुन्नी ३१ टक्के आहेत. पण, सुन्नी सद्दाम, लष्कराच्या बळावर, बहुसंख्य शियांवर अन्याय व अत्याचार करीत असे. आता अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे बहुसंख्य शियांची सत्ता स्थापन झाली आहे. ती सुन्नींना पसंत नाही. म्हणून तेथे रक्तरंजित संघर्ष सतत चालू असतो. सीरियात तर गृहयुद्धच चालू आहे. कोण कुणाला ठार करीत आहे? मुसलमानच मुसलमानांना की नाही? जे सीरियात तेच येमेनमध्ये. तेच अफगानिस्थानात. तेथे सत्तापदच्युत झालेले तालिबान सत्तारूढ मुसलमानांना यमसदनास पाठवीत आहे. हा सर्व रक्तलांछित लांछनस्पद हिंसाचार, जरा गांभीर्याने विचार केला, तर इस्लामलाच लांछित करीत आहे. याच्या विरोधात का झाली नाहीत निषेधप्रदर्शने?
हिंदू धर्माचे उदाहरण
इस्लामला हा आपसी संघर्ष केवळ लांछितच करीत नाही, तर तो इस्लामचे भवितव्यच धोक्यात आणीत आहे. या इस्लामला कोण वाचवू शकेल? माझ्या अल्पमतीप्रमाणे भारतीय मुसलमानच, मनात आणतील, तर हे अवघड काम करू शकतील. भारतीय का? का तर त्यांच्यासमोर हिंदू धर्माचे उदाहरण आहे. हजारो वर्षांच्या वाटचालीत येथे किती तरी पंथ उदयाला आले आणि ते सारे अजून जिवंत आहेत आणि सन्मानाचे जीवन जगत आहेत. वेदांचे प्रामाण्य न मानणारे बौद्ध आणि जैन आहेत. झाले का वैदिक हिंदू आणि बौद्ध किंवा जैन यांच्यात हिंसक दंगे? हां, ‘शास्त्रार्थझालेत? पण शस्त्रार्थझाला नाही.
गीतगोविंदाचा कर्ता कवी जयदेव लिहितो,
‘‘निन्दसि यज्ञविधेरहह् श्रुतिजातम्|
सदयहृदय दर्शितपशुघातम्|’’
म्हणजे हे बुद्धा, यज्ञातील हिंसा बघून दयाशील असलेल्या तू सर्वच श्रुतींची निंदा केलीस. पण त्या बुद्धालाही हिंदूंनी आपला ९ वा अवतार मानले. जयदेव म्हणतो, तू बुद्धशरीर धारण केलेला केशव म्हणजे कृष्णच आहेस. हिंदूंमध्ये बहुसंख्य लोक मूर्तिपूजक आहेत. पण आर्यसमाजी आणि शीख मूर्तिपूजा मानीत नाहीत. पहिले अग्निपूजा मानतात, दुसरे ग्रंथसाहेब. चालू आहे ना त्यांचे अस्तित्व! मग मुसलमानांमध्ये वहावी, सुन्नी, शिया, खोजे, बोहरे, कादियानी हे सारे का चालत नाहीत? पाकिस्तानने तर कादियानींना गैरमुस्लिम ठरविले आहे. असा असहिष्णू, हिंसेला प्रोत्साहन देणारा इस्लाम नव्या काळात टिकेल काय?
आशेला जागा
म्हणून त्याने हिंदूंपासून शिकले पाहिजे. यासाठी उपयुक्त वचने पवित्र कुराणात आहेत. महंमदसाहेब सांगतात, ‘‘आपण ज्याची उपासना करता, त्याची उपासना मी करीत नाही; आणि मी ज्याची उपासना करतो, त्याची उपासना आपण करीत नाही. तुमचा मजहब तुमच्यासाठी. माझा माझ्यासाठी आहे.’’ अन्य ठिकाणी ते म्हणतात, ‘‘हे अल्लाह, जगात असे लोक आहेत की जे तुझ्या अस्तित्वावर विश्‍वास ठेवीत नाहीत. पण त्यांना सहन कर. त्यांना शांती प्रदान कर. त्यांना त्यांची चूक कळून येईल.’’ पवित्र कुराणातील नेमकी सुरा आणि नेमकी आयत मी सांगू शकत नाही. कारण, या क्षणी पवित्र कुराण माझ्या समोर नाही. पण वर उद्धृत केलेली वचने पवित्र कुराणातीलच आहेत. असा व्यापक दृष्टिकोन स्वीकारला की, शिया-सुन्नी किंवा सुन्नी-वहाबी, किंवा कादियानी व अन्य असे हिंसक वादच इस्लाममध्ये उरणार नाहीत. चर्चा अवश्य व्हावी पण हिंसा नाही. ही प्रक्रिया एकदा का सुरू झाली की मग इस्लाम आणि अन्य मते यांच्यातही संवाद सुरू होईल. गन्तव्य स्थान एक असले, तरी त्याच्याप्रत जाण्याचे मार्ग अनेक असू शकतात, हे ते मग मान्य करतील. त्याचप्रमाणे, कोणत्याही धर्मपंथाची जेव्हा वाटचाल सुरू असते, तेव्हा समयानुकूल त्यात परिवर्तन करण्याची गरज असते, हेही ते ओळखतील आणि शाश्‍वत काय, युगधर्म कोणता, आणि आपद्धर्म किंवा अपवादभूत आचरण कोणते याचा विवेक ते करू शकतील. कोणताही विचार, किंवा भावना, विशिष्ट कालबिंदूपाशी जशीच्या तशी थांबलेली राहत नाही. त्यात परिवर्तन करावेच लागते. जे एका कालबिंदूशी थांबतात, ते संपत असतात, हा सनातन नियम आहे. त्या दृष्टीने इस्लामची काळानुरूप व्याख्या करता आली पाहिजे. हिंदूंनी असे केले म्हणून नाना प्रकारच्या जीवघेण्या आपत्तीतूनही त्यांचे धर्म जिवंत राहिला आहे. या संदर्भात मूळ शब्द बदलविण्याची गरज नसते. त्या शब्दांचा आशय अधिक सखोल व अधिक व्यापक करण्याची आवश्यकता असते. हिंदू धर्माच्या विकासाचे याप्रमाणे अध्ययन करणे, भारतीय मुसलमानांना सहज शक्य आहे. ते त्यांनी केले, तरच इस्लामला ते जिवंत ठेवू शकतील. एवढेच नव्हे तर कालोचितही ठरवू शकतील. सध्या पश्‍चिम आशियातील मुस्लिम राष्ट्रे सुंदोपसुंदीत अशी काही एकमेकांशी भिडली आहेत की ते स्वत:बरोबर इस्लामलाही समाप्त करतील. स्वीकारतील काय भारतीय मुसलमान हे आव्हान? ते स्वत:ला नीट सांभाळतील आणि आपल्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवतील आणि प्रसंगी कठोरता स्वीकारून त्यांना आवर घालण्याची हिंमत करतील, तर हे कठीण नाही.
-मा. गो. वैद्य
नागपूर
दि. १८-०८-२०१२
babujivaidya@gmail.com

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी