Tuesday, December 15, 2015

मुंढेजी, अहंकाराचे भूत मानगुटीवरून उतरवा


जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आणि सिद्धेश्वर यात्रा समिती वाद या विषयावर युवापत्रकार सागर सुरुवसे यांचा दैनिक तरुण भारतच्या रविवारच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रसिद्ध झालेला लोकप्रिय लेख

“देवस्थान समितीने संपूर्ण होम मैदानावर मॅट आच्छादन केले आहे. आपातकालीन मार्ग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयालगतचा रस्ताही मोकळा सोडला आहे. ही दोन्ही कामे पूर्ण झाली आहेत आणि उद्घाटन माननीय जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत होत आहे. ही स्वप्नवत कल्पना. पण ही गोष्ट सत्यात उतरली असती जर का जिल्हाधिकारी मुंढे यांनी स्वत:च्या कार्यशैलीत बदल केला असता.’’ हे उद्गार आहेत सोलापुरात जिल्हाधिकारी पदावर राहिलेल्या एका उमद्या अधिकार्‍यांचे. अर्थातच त्यांनी आपली ही भावना खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
संत ज्ञानेश्‍वरांनी अशा स्वभावाच्या व्यक्तींचे वर्णन मोठ्या चपखलपणे केले आहे. ज्ञानोबा म्हणतात, ‘अहंकाराचे वागणे मोठ्या नवलाचे आहे. अज्ञानी, सर्वसामान्य लोकांच्या मागे तो लागत नाही. पण बुद्धीमंतांच्या मात्र तो मानगुटी बसतो. त्याला आपल्या तालावर नाचायला लावतो.’ सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्या वर्तनाला हे वर्णन तंतोतंत लागू पडते.

वस्तुत: ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्‍वर यात्रेला मोठी परंपरा आहे. होम मैदानावरील सुमारे महिनाभर चालणारी यात्राही सोलापूरकरांच्या दृष्टीने अभिमानाचा विषय आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर आंध्र आणि कर्नाटकांतूनही भाविक मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी होतात. नंदीध्वजांचा अक्षता सोहळा ही या यात्रेची विशेषता आहे. या सोहळ्याला तीन लाखाहून अधिक भाविकांची उपस्थिती असते. इतर देवस्थानच्या यात्रा आणि सोलापूरची यात्रा यामध्ये एक मूलभूत फरक आहे, तो म्हणजे ही यात्रा शहराच्या मध्यभागी असलेल्या १८ एकर इतक्या मोठ्या मैदानात भरते. या महत्त्वपूर्ण बाबी श्री. मुंढे यांनी दुर्लक्षित केल्या.
देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांना समाजात मोठा मान आहे. सोलापुरातील अजातशत्रू व्यक्तीमत्त्व म्हणून देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची समाजात प्रतिमा आहे. देवस्थान समितीच्या पदाधिकार्‍यांना मुंढे यांनी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली. मुंढे यांची ही खूप मोठी चूक होती. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा आग्रह योग्य की अयोग्य हा प्रश्‍न बाजूला पडला. जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांसोबत खासगीत बोलताना ज्या प्रकारच्या पुड्या सोडल्या, जी भाषा वापरली ती मुळात आक्षेपार्ह होती. त्यांच्या पदाला ती शोभणारी तर नक्कीच नव्हती.
मुंढे यांची भाषा संवादाची कधीच राहिली नाही. नियमांचे कोलीत घेऊन त्यांनी बेताल वक्तव्ये केली. शोभेच्या दारूकामाला परवानगी घेतली नाही तर शोभेचे दारूकाम थांबवून दाखवतो. आराखडा आणि नियमानुसार काम झाले नाही तर देवस्थान समितीवर गुन्हा दाखल करतो. ही त्यांची भाषा लोकांना मुळीच रुचणारी नव्हती. संवादाची भाषा अशी नसते.
धूळ उडू नये, त्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, हे कोणीही नाकारू शकत नाही. आपातकालीन यंत्रणाही सक्षम असली पाहिजे याबद्दलही कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. परंतु, मुंढे यांनी हे मुद्दे ज्या पद्धतीने हाताळले, त्यावरून त्यांच्याबद्दल संशय व्यक्त व्हायला पुरेशी जागा आहे. मुळात श्री. मुंढे यांनी यात्रा कशी भरते, याचा अनुभव घेतला नाही. त्यामुळे अनेक टप्प्यांतून होणारी यात्रा त्यांना समजलीच नाही. आपत्तीव्यवस्थापन हा लोकांच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. त्या शब्दाचा त्यांनी पुरेपूर वापर केला.
अक्षता सोहळा हा गड्डा यात्रेतील महत्त्वाचा विधी. यावेळी सर्वाधिक गर्दी असते. संमती कट्टाजवळ हा सोहळा भरतो. या ठिकाणी आपातकालीन उपाययोजना करण्याचा विषय मुंढे यांनी चुकूनही काढला नाही. १८ एकर एतक्या विस्तीर्ण होम मैदानाच्या एका कोपर्‍यात भरणार्‍या पाळणे, मनोरंजन नगरी, खेळण्यांची दुकाने या ठिकाणच्या आपत्ती व्यवस्थापनाचीच त्यांना जास्त चिंता लागून राहिली. त्यातही आपत्ती व्यवस्थापन मार्ग मोकळ्या मैदानाच्या बाजूला नाही तर भिंतीच्या बाजूने असा हट्टही त्यांनी धरला.
यात्रा काळात कलेक्टर कचेरीच्या कंपाऊंड लगतच्या रस्त्यावर यात्रा कायमस्वरूपी भरवावी आणि यात्रेच्या काळात सदर रस्त्याचा पट्टा वाहतुकीसाठी बंद ठेवावा. या रस्त्यावर यात्रा भरवण्यास महानगरपालिकेने प्रतिबंध करू नये, असे स्पष्ट आदेश न्यायालयाने दिले आहेत. याकडेही जिल्हाधिकारी यांनी दुर्लक्ष केले. इतकेच नाही तर आकाशवाणी आणि प्रसारमाध्यमे या माध्यमातून अर्धवट माहिती सांगून संभ्रम निर्माण केला.
मुळात सोलापूरकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न, आपातकालीन मार्ग, मॅटींग या दाखवण्याच्या बाबी आहेत. होम मैदानावरील जागांचे लिलाव देवस्थान समिती करते, हे त्यांचे खरे दुखणे आहे. या मुद्द्यावर उलटसुलट वक्तव्ये देण्यापेक्षा कायदेशीररीत्या शांतपणे विषय हाताळणे गरजेचे आहे. रे.मु.नं. २/१८७१ च्या हुकुमनामाप्रमाणे होम मैदानावरील जागा वाटप आणि त्या ठिकाणचे भाडे वसूल करण्याचा हक्क देवस्थानला आहे. या हक्काला अडथळा आणू नये आणि यात्रेत ढवळाढवळ करू नये, अशी सक्त ताकीद न्यायालयाकडून देण्यात आली आहे. तरीही जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांनी शेलक्या भाषेचा वापर करून शिंतोडे उडवले, हे कधीही समर्थनीय नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एका प्रवेशद्वारावर तेथील दर्गावाल्यांनी अनेक वर्षांपासून ताबा घेतला होता. दर्गावाल्यांनी मूळ थडग्याच्या दहापट अतिक्रमण केले आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी त्या विषयात अवाक्षरही काढला नाही. दर्गावाल्यांना बोलावून त्यांच्याशी गुपचूप बोलणी केली. दर्ग्याचे अतिक्रमण काढता की गुन्हे दाखल करू, अशी भाषा मुंढे यांनी वापरली नाही. सिद्धेश्‍वर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील थडग्यांचा वाढता विस्तार आटोक्यात आणण्यासाठीही काही गवगवा केला नाही.
दिवाळीत फटाक्यांचे स्टॉल मैदानात, गणेशोत्सवात मूर्तीविक्री मैदानात पण रमजानमध्ये मीनाबाजार मैदानात का नाही, असा सवाल मुंढे यांना कोणी विचारला तर तो चुकीचा आहे, असे म्हणता येईल काय? मीना बाजारची गर्दी पाहा, तेथे आपत्ती व्यवस्थापनाच्या नियमांची गरज नाही असे कोण म्हणेल? सिद्धेश्‍वर मंदिरासमोरील मुल्ला बाबा टेकडीवरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी का नाही, याचा अभ्यास जिल्हाधिकारी करणार आहेत काय?
नियम हे लोकांच्या कल्याणासाठी असतात. समोरच्या व्यक्तीला तुच्छ लेखून केवळ कायद्याचा सोयीने वापर करण्यात येत असेल तर त्यातून संघर्ष उद्भवणे अपरिहार्य आहे. मुळात जिल्हाधिकारी यांना या यात्रेची फारशी माहिती नाही. पण ज्या पद्धतीने ते शहरातील वातावरण अ‘मंगल’ करत आहेत ते पाहता यामागचा बोलवता धनी कोण हे फार काळ लपून राहणार नाही. त्याचाही आम्ही योग्य वेळी पर्दाफाश करूच.
13 Dec. 2015, Solapur Tarun Bharat, AAsmant

(दर रविवारी तरुण भारतच्या आसमंत पुरवणीत वाचा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचे सडेतोड लेख)

मागील सडेतोड साठी पाहा खालील लिंक
पुनश्‍च एकदा सडेतोड


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी