Wednesday, June 29, 2022

ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन

बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली

‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.


पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्‌‍' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.

पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. 

लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्‌‍ने झाली.

पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार

प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. 

पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र
लेखक - मिलिंद सबनीस
प्रकाशक - जटायु अक्षरसेवा
मूल्य - ५९९
सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)

पुस्तक मागवण्यासाठी jataau.com/shop/rishi-bankim

9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.

Tuesday, May 10, 2022

ओळख वंदे मातरम् रचेत्या ऋषी लेखकाच्या चरित्राची / ऋषी बंकिमचंद्र

 

ऋषी बंकिमचंद्र
पाच पिढ्या लोटल्या. बंकिमचंद्रांबद्दल दोन ओळींचीच माहिती पुढे आली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीतील हे गीत आहे.. या त्या दोन ओळी. गेल्या 128 वर्षांत मराठी भाषेत एकही चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला नाही.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा - वंदे मातरम्च्या रचेत्याचे प्रेरक चरित्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करायचे जटायु अक्षरसेवाने ठरवले. ऋषी बंकिमचंद्र या नावाने ते प्रकाशित होत आहे. वंदे मातरम् आणि बंकिमचंद्र यांच्यावर दोन तपाहून अधिक काळ अभ्यास करणारे तपस्वी लेखक मिलिंद सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे चरित्रग्रंथ साकार झाले आहे. या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा लेख येथे सादर आहे.


ग्रंथाचे नाव    : ऋषी बंकिमचंद्र
लेखक    : मिलिंद सबनीस
प्रकाशक     : जटायु अक्षरसेवा
पृष्ठे    : सुमारे 240
मूल्य    : 599/-
सवलत मूल्यात घरपोच मागवा    : 499/-
संपर्क    : 9767284038
UPI    : jataa108@uboi


एका अलौकिक स्फुरणाचे स्मरण


सुमारे बाराशे वर्षांच्या चिवट संघर्षानंतर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण साजरा करत आहोत. यानिमित्ताने त्या हजार-बाराशे वर्षांमध्ये भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणार्‍या हजारो वीरांचे, योद्ध्यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या अनुषंगाने ‘जटायु अक्षरसेवा’ या प्रकाशन संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेले वंदे मातरमचे उद्गाते, आनंदमठकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला केलेले हे अनोखे अभिवादन आहे, असे म्हटले पाहिजे. याबद्दल  या चरित्रग्रंथाच्या निर्मितीत पुढाकार घेतलेले सिद्धाराम पाटील आणि मिलिंद सबनीस यांचे हार्दिक अभिनंदन.

या उपक्रमाला अनोखे अभिवादन म्हणण्याची अनेक कारणे आहेत. 
सर्वात पहिले म्हणजे बंकिमचंद्र यांचे मराठीत प्रसिद्ध होत असलेले हे पहिलेच चरित्र आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे बंकिमचंद्रांना लेखकाने सहर्ष आणि साभिमान प्रदान केलेली ‘ऋषी’ ही श्रेष्ठ उपाधी! बंकिमचंद्रांना राष्ट्र निर्माता आणि ऋषी या दोन विशेषणांनी गौरव केला तो महर्षी अरविंद यांनी! त्यासंदर्भात योगी अरविंदांनी ऋषी या संज्ञेची केलेली मीमांसा सबनीस यांनी आवर्जून या पुस्तकात नमूद केली आहे. अनोखेपणाचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच या पुस्तकातील मांडणीचा आशय आणि त्याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देखण्या चरित्राचे उलगडलेले विविध विलोभनीय पैलू!

वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अत्यंत प्रत्ययकारी कविता लिहिणार्‍या शालेय वयातील बंकिमचे साहित्यगुण त्यांचे गुरू, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक ईश्वरचंद्र गुप्त यांनी ओळखले आणि त्यांनीच त्याला पद्याबरोबरच गद्य लेखनही सुरू कर, असा सल्ला दिला. गुरूच्या संदेशाशी बंकिमचंद्रांच्या लेखणीने पूर्ण इमान राखले. इतके की, ‘आधुनिक कादंबरीचे जनक’ असे अजरामर स्थानच तिने बंकिमचंद्रांना प्राप्त करून दिले. कादंबरी शिवाय कथा, विनोदी लेख, विज्ञान, टीकात्मक लेख, निबंध, ललित लेख असे गद्य वाङ्मयाचे जवळजवळ सर्व प्रकार बंकिमचंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले. दोन पृष्ठांच्या निबंधापासून ते 434 पृष्ठांच्या महाकादंबरीपर्यंत विविध आकाराच्या विस्ताराचे त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि प्रत्ययकारी असे. ‘बंगदर्शन’सारखे साहित्यिक नियतकालिक अत्यंत समृद्ध स्वरूपात सादर करून त्यांनी आपले संपादकीय नैपुण्यही अधोरेखित केले.

सामान्यतः कथा, कादंबरी, ललितलेख यासारखे साहित्य रंजनप्रधान आणि लोकप्रियतेचा अनुनय करणारे आढळते. मात्र बंकिमचंद्र यांच्या कादंबर्‍या विविध साहित्य रसांचा उत्तम परिपोष करतात आणि त्याचबरोबर प्रबोधन, सामाजिकता आणि राष्ट्रीयता यांचे जागरण, पराक्रम-वीरता यांचे संवर्धन, धर्माचा आधुनिक विचार-प्रसार तसेच जेत्यांनी लिहिलेल्या भ्रामक इतिहासाचा पर्दाफाश... यासारख्या राष्ट्रप्रेमी सामाजिकतेचेही संवर्धन करतात.

दुर्गेश नंदिनी या पहिल्या कादंबरीपासून कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आदी सर्व कादंबर्‍यांचे अत्यंत धावते परंतु समर्पक रसग्रहण करीत मिलिंद सबनीस यांनी बंकिमचंद्र यांच्या लेखणीचे हे विशेष सोदाहरण उलगडून दाखवले आहेत. आर्य चाणक्याने जागवलेल्या एकराष्ट्रीयतेच्या प्रेरणेशी साधर्म्य दर्शवणारे, जवळीक साधणारे लेखन बंकिमदांनी केले असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण मिलिंद सबनीस यांनी नोंदवले आहे.

बंकिमचंद्रांनी इंग्रजी प्रशासनाची चाकरी पत्करली हे खरे; परंतु आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रभावना तसेच तिचा आपल्या साहित्यातून प्रसार यांच्याआड ती नोकरी येऊ दिली नाही. तसेच नोकरीच्या माध्यमातून आलेली न्यायदानाची जबाबदारी निष्ठेने पार पाडताना ब्रिटीश अधिकार्‍यांना दंड, शिक्षा फर्मावतानाही कोणत्याही दडपणाचा दबाव बाळगला नाही. यामुळे अधिकार्‍यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु त्यांच्या कठोर कर्तव्यदक्ष कारभारामुळे आणि प्रतिमेमुळे त्यांच्या नोकरीवर शासनाकडून कधीच गदा आली नाही. सतत बदल्यांच्या रूपाने काही प्रमाणात त्याची शिक्षा त्यांना अनुभवावी लागली. पण तीही त्यांनी विनातक्रार सहन केली. मात्र आपला न्यायनिष्ठेचा बाणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या समतोलाचेही उत्कृष्ट वर्णन मिलिंद सबनीस यांनी केले आहे.

उपासकाच्या रूपात बंकिमचंद्र हे विष्णूभक्त-वैष्णव होते. परंतु विष्णूची आराधना करतानाही त्यांनी दुष्टांचे निर्दालन आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी कर्मयोगाचा संदेश देणार्‍या विष्णू रूपाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘आनंदमठ’मधील संन्यासी संतान (संथाळ) वैष्णवधर्मीच आहेत. या संतांनांच्या उठावाचे नेतृत्व करणारे वृद्ध संन्यासी सत्यानंद यांच्या तोंडी बंकिमदांनी अर्थपूर्ण वक्तव्याद्वारे वैष्णव धर्माचे उत्तम विश्लेषण मांडले आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात, “खर्‍या वैष्णव धर्माचे लक्षण म्हणजे दुष्टांचे निर्दालन आणि या धरणीमातेचा उद्धार! कारण जगाचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याने दहा अवतार घेऊन या जगाचा उद्धार केला. केसरी, हिरण्यकश्यपू, मधुकैटभ इत्यादी दैत्यांचा नाश त्यानेच केला. रावण, कंस आदी राक्षसांना त्यांनीच मारले. तोच जेता आणि पृथ्वीचा उद्धारकर्ता आणि तोच आहे संतानांचे इष्टदेवता... संतानांचा विष्णू केवळ शक्तीरूपी आहे...”

‘आनंदमठ’च्या माध्यमातून बंकिमदांनी एका बाजूने शक्तीच्या उपासनेचा आणि त्या शक्तीच्या अधिष्ठानावर इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देणार्‍या चळवळीची प्रेरणा जागविली, तर दुसर्‍या बाजूने त्या चळवळीला सात्विक सामर्थ्य प्रदान करणारा ‘वंदे मातरम्’ हा पंचाक्षरी मंत्र उजागर केला. स्वाभाविकपणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रकथेचा सर्वात मोठा भाग ‘वंदे मातरम्’ने व्यापला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सारी इमारतच मुळी वंदे मातरमच्या भक्कम पायावर उभी राहिली आणि यशस्वी फलनिष्पत्तीकडे गेली.

वंदे मातरम् या गीताने काय काय आणि कोणा कोणाला प्रेरित केले याची सूची फार मोठी आहे. राष्ट्रयोगी महर्षी अरविंद, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेकानेक क्रांतीकारक यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत वंदे मातरमने प्रज्वलित केली. 1902 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या घरी झालेल्या एका देशभक्त समूहाच्या बैठकीत ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. योगी अरविंद घोष या बैठकीला उपस्थित होते. या संघटनेच्या नावातील ‘अनुशीलन’ या शब्दाचा स्वीकार बंकिमचंद्र यांच्या लेखातल्या शीर्षकातूनच केला गेला होता.

दक्षिणेचे वासुदेव बळवंत फडके म्हणून ओळखले जाणारे अल्लुरी सीताराम राजू या आदिवासी लढवय्या क्रांतीकारकांनी आनंदमठ वाचूनच संन्यास ग्रहण केला आणि ब्रिटीशांचे राज्य उलथवण्यासाठी सशस्त्र चळवळ हाती घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरू गुरूदास बॅनर्जी यांनी बंकिमचंद्र यांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असा केला होता. अनुशीलन समितीतर्फे ‘युगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. त्या वृत्तपत्राचे संपादक पद काही काळ स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी भूषवले होते. 1905च्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भगिनी निवेदिता यांनी भारताचा जो ध्वज फडकवला (या ध्वजाची रचना स्वतः निवेदितांनी केले होते), त्यावर मध्यभागी ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे रेखांकित केली होती. त्याआधी ऑगस्ट 1905 मध्ये वंगभंग विरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीची प्रचारसभा कलकत्त्यात झाली. त्यासोबत वंदे मातरमचा उद्घोष उच्च स्वराने केला गेला. वंगभंगविरोधी चळवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे. त्या चळवळीचा मंत्रच मुळी वंदे मातरम हा होता. 1906 मध्ये बारिसाल येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमचा गजर करणार्‍या कार्यकर्त्यांवर इंग्रज पोलिसांनी लाठीहल्ला केला. ब्रिटीश शासनाच्या उरात वंदे मातरम या घोषणेने जणू धडकीच भरली होती.

1906 मध्येच वंगभंगाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या सभेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम् मधोमध अंकित केलेलाच ध्वज फडकवला. एक वर्षानंतर 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी या नात्याने मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जो ध्वज फडकवला त्यावरही ‘वंदे मातरम’ हेच शब्द होते.

एकोणीस वर्षांचा तरणाबांड खुदीराम बोस, लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळ्या झाडणारा तेजस्वी युवक मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहीडी आदी क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा उद्घोष करीतच हौतात्म्य पत्करले. तर चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करणारा सूत्रधार मास्टर सूर्यसेन यांची कथा तर अधिकच रोमांचक आहे. सूर्यसेनदांना फाशी देण्याच्या आदल्या रात्री 12 जानेवारी 1934 रोजी त्यांच्या कोठडीत नेत असताना ते वंदे मातरम्च्या घोषणा देत राहिले. त्यासाठी त्यांना अमानुष मारहाण जेलच्या अधिकार्‍यांनी केली. तरीही त्यांनी गर्जना थांबवली नाही. लाठ्यांच्या प्रहाराचा इतका वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला की, शेवटी ते बेशुद्ध पडले. त्याच बेशुद्धावस्थेत त्यांना फासावर चढवण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम्च्या प्रेरणेबाबतचा हा सारा तपशील अतिशय उद्बोधक रीतीने पुस्तकात नमूद केला आहे. नंदुरबारचा कोवळा किशोर शिरीषकुमार, कनकलता बरुआ ही आसामची बाल वीरांगणा यांनीही वंदे मातरम्च्या गजरातच ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या.

वंदे मातरम् या नावाने वृत्तपत्रसृष्टीला ही भुरळ घातली. या नावाचे पहिले साप्ताहिक बंगालमध्ये सुरू झाले. त्याचे पहिले संपादक बिपिनचंद्र पाल तर नंतरचे अरविंद घोष! 1908 मध्ये पुण्यातून, 1909 मध्ये जिनिव्हा येथून (मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्रजीत सुरू केले), 1914 मध्ये स्वित्झर्लंड येथून, 1920 मध्ये दिल्लीहून (लाला लजपतराय - हिंदीतून) वंदे मातरम् नावाची वृत्तपत्रे निघाली. वंदे मातरम् या शब्दसमुच्चयाचे आणि त्यातून व्यक्त होणार्‍या भावनेचे सामर्थ्य असे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होऊ लागले ते साधारण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून-1902 पासून. मात्र त्या सुप्त आणि सशक्त सामर्थ्याची जाणीव स्वतः बंकिमदांना मात्र त्या आधी किमान पंधरा वर्षांपासूनच स्पष्ट होती. 1890 मध्ये बंकिमचंद्र यांनी आपली कन्या शारदा कुमारीशी बोलताना, ‘एक दिवस तू पाहशील, दहा -वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल. एकटा बंगालच काय, सारा हिंदुस्थान या गीतापासून स्फूर्ती घेईल. सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल...!’ या भाकितानंतर पंधरा वर्षांनी बंकिमदांचे हे शब्द अक्षरशः खरे ठरले.


बंकिमचंद्रांचेे भाचे शचिंद्रनाथ यांना तर त्यांनी म्हटले होते की, ‘माझे बाकी सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हे गीत मात्र शाश्वत ठरेल आणि देशाचे हृदय जिंकेल.’ केवढा प्रचंड आत्मविश्वास हा द्रष्टा लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल व्यक्त करीत होता!

आपल्या जन्मभूमीच्या मातीला माता स्वरूप बहाल करून देशभक्तीला मातृभक्तीचे रूप प्रदान करणारी उदात्तम भावना केवळ आणि केवळ भारतातच सर्वात प्रथम जन्माला आली, हे ऐतिहासिक सत्य आहे. वंदे मातरम् हे त्याच उदात्त भावनेचे स्फुरण आहे. याच स्फुरणाची प्रक्रिया आणि इतिहास अत्यंत मनोवेधक आहे. 1762 ते 1774 या काळात झालेल्या इंग्रज विरोधी संन्यासी-उठावाची पार्श्वभूमी कलकत्त्याच्या जवळच असलेल्या नैहाटी कांटलपाडा या आपल्या जन्मगावीच कार्तिक शुद्ध नवमी  7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्रांना झालेले या बंगाली-संस्कृत मिश्र भाषेतील गीताचे स्फुरण, 1882 मध्ये त्या संन्यासी उठावावरच आधारलेल्या आनंदमठ या दिव्य कादंबरीत त्या गीताचा केलेला समावेश आणि मुख्यतः 1905 पासून वंगभंगाच्या चळवळीपासून थेट आजतागायत या पंचाक्षरी मंत्राने देशभक्त भारतीयांच्या हृदयाचा घेतलेला ठाव... हा सारा रोमहर्षक प्रवास अतिशय सुलभ भाषेत मराठी वाचकांसमोर साकार करणारे मिलिंद सबनीस आणि तो इतिहास पुस्तकरूपाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यापाशी सादर करणारे जटायु अक्षरसेवा हे दोन्ही शतशः अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यास खूप खूप शुभेच्छा!

( ग्रंथ मागवण्यासाठी संपर्क : 9767284038)

- अरुण करमरकर!!!!

jataau.com/shop

Sunday, December 20, 2020

धन्य ते जीवन...

मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.


स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.
११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ.
ही त्यांची शेवटची भेट ठरली.

९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’.
ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.
९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते.
एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?.
सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.
शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.
इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले.

विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.
विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.
हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.

Sunday, October 25, 2020

वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द

Veershaiv Lingayat Hindu

वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.


वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन 

सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले. सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावे‌ळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. 

जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

 आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी 

 आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत. लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ 

 काय आहे पुस्तकात ? 

 महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.
9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.
पृष्ठे ३६, मूल्य ३०/ 
पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल

  

Saturday, July 25, 2020

भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !

श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !
फक्त तीन ते चार महिन्यात
त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब वाहिनीची सदस्यसंख्या एक लाखावर पोहोचली आहे.
दृश्य संख्या 1 कोटी 19 लाख.

एखाद्या वैचारिक विषयावरील
युट्युब वहिनीला
शंभर-सव्वाशे दिवसात
इतके सदस्य मिळणे
ही बाब साधारण नाही.

पाठीमागे कोणतीही माध्यम संस्था नसताना
एखाद्या पत्रकाराला
अशी जनमान्यता मिळणे
हे महाराष्ट्रातील
पहिलेच उदाहरण ठरावे.

येथे उल्लेखनीय बाब म्हणजे
भाऊ यांना आपल्या ब्लॉगसाठी,
आपल्या युट्यूब वाहिनीसाठी
एका रुपयाची सुद्धा जाहिरात
करावी लागली नाही.

भेदक विश्लेषण, साठ वर्षांचा पत्रकारितेतील दांडगा अनुभव, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडण्याची शैली, प्रांजळपणा, मांडणीतील सातत्य, साधेपणा, निस्पृहता, दांडगी स्मरणशक्ती, तटस्थता, नवीन शिकण्याची जिद्द, परिश्रम, प्रसिद्धीने हुरळून न जाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव, अभ्यासोनी प्रकट व्हावे या उक्तीचे पालन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, निर्भिड स्वभाव आणि निरागसता...

यामुळेच महाराष्ट्राने
भाऊंना डोक्यावर घेतलं आहे.
भाऊ ( Ganesh Torsekar )
यांचे प्रबोधन कार्य असेच चालू दे...
मनापासून शुभेच्छा...

विशेष नोंद :
कथित पुरोगामी मंडळींनी पोसलेला बुद्धीच्या क्षेत्रातील दहशतवाद
मोडीत काढण्याचा मार्ग
प्रशस्त करण्याचे ऐतिहासिक काम
जोखीम पत्करून करणे
हे एक मोठे धाडस आहे.
असे धाडस
निस्पृहतेमधूनच
येत असते.
कमालीची निस्पृहता
ही भाऊंची ठळक ओळख आहे.

(एक लाख सदस्य संख्या झाल्यानिमित्ताने भाऊंचे मनोगत...
https://youtu.be/z2vSdR7tv3c)

--------------------
नोंदी सिद्धारामच्या...
psiddharam.blogspot.com

Sunday, May 3, 2020

हमीद दाभोलकर, हमीद दलवाई आणि अंनिस


हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हमीद दाभोलकर यांनी स्वतःचा एक जुना लेख आपल्या fb वर शेअर केला आहे. (https://m.facebook.com/story.php?story_fbid=790338144829584&id=100015602171173) हा लेख खूप प्रभावी अन् विचार करायला लावणारा आहे.
त्यातील एका मुद्द्याने मला अस्वस्थ केले आहे. (तो मुद्दा येथे स्क्रीन शॉट ने जोडला आहे.)
नाव हमीद अन् आडनाव दाभोलकर यामुळे हमीद दाभोलकर यांना शाळेत मुले लांड्या म्हणून चिडवू लागली. का चिडवत असतील तर हमीद दा. यांना वाटतं की, "चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवाजी व अफजल खान लढाई वर्णन आहे. त्यामुळेच हे घडले असावे."
हा गंभीर मुद्दा आहे. अनेक प्रश्न पुढे येतात..
१. शिवाजी - अफजल खान लढाई वर्णनात कोठेही लांड्या हा शब्द आलेला नाही. किंवा अफजल खानशी संबंधित हमीद नावाची व्यक्तिरेखा सुद्धा नाही. मग मुले चिडवण्याचे कारण शिवाजी - अफजल खान लढाई असेल का ?
२. शिवाजी - अफजल लढाई वर्णन हे कारण असेल तर मग हा धडा अभ्यासक्रमात असू नये असे सुचवायचे आहे का ?
३. रोज बातम्यांमध्ये कुठे हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ये तोयबा, जैश ए मोहम्मद, तालिबान, लादेन, दानिश, इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा, कसाब, जिना, अफजल गुरू, याकुब वगैरे अतिरेकी, जिहादी यांचा उल्लेख येत असतो. मुलांच्या पाहण्यात, वाचनात या बाबी येतातच. मग केवळ चौथीचा धडा वगळल्याने भागेल का?
४. थोर नेते शरदचंद्र पवार सुचवतात त्याप्रमाणे तब्लीगी, जिहादी, अतिरेकी यांच्या बातम्याही प्रसिध्द करायच्या नाहीत, अशी मागणीही होऊ शकते. समजा ही मागणीसुद्धा मान्य झाली तर मूळ प्रश्न सुटणार आहे का ? (मूळ प्रश्न हिंदू - मुस्लीम एकता कशी नांदेल हा आहे.)
५. थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम हे सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव उच्चारताना कोणीही विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हमीद यांना चिडवल त्या शब्दाचा वापर करत नाहीत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.

त्यामुळे शिवाजी - अफजल खान लढाई वर्णन ही अडचण असू शकत नाही. बातम्यांतून पुन्हा पुन्हा पुढे येणारी अतिरेक्यांची नावेही समस्या असणार नाहीत. समाजापुढे डॉ. APJ कलाम यांच्यासारखी चरित्रे आणावी लागतील आणि त्याच वेळी अफजल खान, अफजल गुरू अन् कसाब यासारख्या व्यक्तींची गत काय होते हेही पुढे आणावे लागेल.

वाईट काम करेल त्याला दंडित केले जाते आणि चांगले काम केल्यास गौरव होतो. लोक डोक्यावर घेतात. येथे त्याचे नाव कोणत्या धर्मातील आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, याला काही किंमत नसते. हे विचार नव्या पिढीवर बिंबवले पाहिजे. यासाठी अंनिस मोठी भूमिका निभावू शकते. हमीद दलवाई यांना हेच अपेक्षित असावे.
परंतु, धार्मिक भेदाभेद वाढू नये म्हणून अफजल खान वध शिकवू नका, अतिरेकी काही केले तरी त्यावर बातम्या दाखवू नका... गप्प राहा.. डॉ. APJ यांच्या सारख्या महान व्यक्तीचा गौरव टाळा... अशी भूमिका अंनिस घेणार असेल तर पदरी फार काही पडणार नाही.

- सिद्धाराम

Wednesday, April 29, 2020

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी

Aparna Ramtirthkar
चला नाती जपुया आणि आईच्या जबाबदार्‍या हे कौटुंबिक विषय घेऊन ज्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यांत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली, लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकलेल्या शेकडो मुलींना अलगद बाहेर काढून त्यांच्या पालकांना सोपवलं, शेकडो कुटुंबे घटस्फोटापासून, उद्ध्वस्त होण्यापासून ज्यांनी वाचवली त्या अ‍ॅड. अपर्णा  अरुण रामतीर्थकर तथा अपर्णाताई यांचे मंगळवार, दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.45 वाजता सोलापूर येथील अश्विनी रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. यानिमित्त सिद्धाराम भै. पाटील यांचा लेख 

पक्षाघाताचा झटका आल्याने गुढी पाडव्याच्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिली अन् अखेर वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या मागे मुलगा आशुतोष, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी.
पती, पत्नी दोघेही विचारांचे पक्के होते. आपण घेतलेल्या भूमिकेसाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. किंबहुना आपण स्वीकारलेला मार्ग हा खडतर आहे, काट्याकुट्याचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. कटु असलेले सत्य मांडताना आडपडदा ठेवायचा नाही. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. सत्य थोडेही डायल्यूट न करता, तीव्रता कमी न करता थेट मांडणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.


कटु सत्य भेदकपणे मांडण्याची रामतीर्थकर शैली महाराष्ट्रातील सामान्य माणसाने सहज स्वीकारली. आपली मानली. पण, काही मतलबी बुद्धीजीवींनी आपल्या मनातील संकुचितता अपर्णाताईंना चिटकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अपर्णाताई या मध्ययुगीन मानसिकतेच्या समर्थक आहेत येथपासून ते त्या स्त्री जातीच्या शत्रू आहेत, येथपर्यंत अनेक आरोप होत राहिले. पण याच वेळी समाजाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.
महिन्यातील किमान 25 ते 28 दिवस प्रवास करणे ही त्यांची दिनचर्याच बनून गेली होती. पायात जणू भिंगरी. अफाट जनसंपर्क. महाराष्ट्रातील गावोगावी आणि बहुतेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्‍यांत शिवसेना, भाजपा, हिंदू जनजागरण समिती, विविध ज्ञाती संस्थांचे कार्यकर्त  होते. तसे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पडद्यामागून आयोजन करणारे कार्यकर्तेही होते. मठ-मंदिरांचे विश्वस्त, महिला मंडळे, प्रगतशील शेतकरी असे विविध थरातील कार्यकर्त्यांसाठी अपर्णाताई दैवत बनल्या होत्या.  
सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली आणि चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ मांडला होता. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. काही सभांना 30 ते 40 हजारांची उपस्थिती.
एखादी सामान्य स्त्री मनात जिद्द बाळगून पुढे आली तर ती असामान्य काम उभे करू शकते याचे अपर्णाताई या जीवंत उदाहरण. अपर्णाताई या मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून सोलापूरला आल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.
रोज व्याख्यान म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारत, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली. दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करत.
कामाची गरज ओळखून त्यांनी आपले जीवन अनेक अंगांनी फुलवले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तित्वाला त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचा पाया होता. जे काही करायचं ते समाजासाठी. आर्थिक स्थिती बेताची असतानाही जी निस्पृहता त्यांनी शेवटपर्यंत दाखवली त्याला तोड नाही. पैशाविषयीचा जो भाव श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ठायी होता तोच भाव रामतीर्थकर दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या अंगी असलेले धाडस यातूनच आले असावे.
अपर्णाताई यांचा सहवास मिळालेला प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभावाने बांधला जात असे. खंबीर बोलणार्‍या अपर्णाताई मनाने खूपच हळव्या होत्या. सुलभ, सोप्या भाषेत लिहिणार्‍या अपर्णाताई सिद्धहस्त लेखिका होत्या. कुठे तरी चुकतंय हे दै. पुण्य नगरीतील साप्ताहिक सदर अनेक वर्षे महाराष्ट्रात गाजलं. दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या पत्नींशी हितगुज करणारे सदरही पत्रकारितेतील त्यांचा अधिकार सांगणारे ठरले. मराठी माध्यम जगताला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा अपर्णाताई यांनी वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत मंथन नावाने प्रबोधन करणारी साप्हाहिक मालिका चालवली. प्रभावी वक्त्या म्हणून परिचित असलेल्या अपर्णाताई या हौशी कलावंत होत्या. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला.
नाटक, समाजसेवा, कायदा,  समुपदेशन असे कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हते. सोलापुरात पाखर संकुल आणि उद्योगवर्धिनी या संस्था नावारूपास आणण्यात अपर्णाताई यांचा वाटा सिंहाचा होता. या संस्थांनी हजारोंच्या संख्येने महिलांना स्वावलंबी बनवले. अंगी संघटन कौशल्य होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पु. भा. भावे हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे जीवन अनुकरणीय होते.  त्यांच्या व्याख्यानांवरून अनेकदा वादळ उठले तेव्हाही त्या अतिशय शांत होत्या. आपले संतुलन त्यांनी ढळू दिला नाही. सनातन संस्थेचे  संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावर अपर्णाताई यांची श्रद्धा होती. अपर्णाताई यांचे जीवन हे एका तपस्विनीचे जीवन होते.

संघ गीताच्या पुढील ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात...
पतझड के झंझावातों में
जग के घातों प्रतिघातों में
सुरभी लुटाता सुमन सिहरता
निर्जनता में भी खिलता है
दिव्य ध्येय की ओर तपस्वी
जीवनभर अविचल चलता है.


तीन जिस्म मगर एक जान

Shubhangi Buwa, Aparna Ramtirthkar & Chandrika Chauhan

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर, चंद्रिका चौहान आणि शुभांगी बुवा ही तीन नावे सोलापूरच्या सामाजिक विश्वात एकत्रितरीत्या घेतली जातात. सुमारे दोन तप म्हणजे 24 वर्षांहून अधिक काळ या तिघींनी पाखर संकुल, शुभराय मठ आणि उद्योगवर्धिनी या तिन्ही संस्था एकदिलाने नावारुपास आणल्या. कुटुंबपद्धती टिकून राहावी. देशभक्ती आणि हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये रुजावी, ही तळमळ तिघींची समान प्रेरणा. या बाबतीत अपर्णाताई अगदी कट्टर होत्या. याबद्दल चंद्रिका चौहान म्हणतात, आम्ही तिघी खूप भांडत होतो. नंतर रडतही होतो. पण बाहेर समाजासमोर येताना आम्ही तिघी एकत्रच. तीन जिस्म मगर एक जान है हम, असे आम्ही गंमतीने म्हणत असू. बाबा म्हणजे अपर्णाताईंचे पती अरुण रामतीर्थकर बुद्धीवादी. मोठे विचारवंत. मी बायको, मला काही येत नाही. मी तर सामान्य गृहिणी, अशी अपर्णाताईंची भावना. शिक्षणही अर्धवट होतं. पण पतीकडून शिकण्याची जिद्द मात्र होती. पतीकडून सर्वकाही शिकल्या. पतीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंजून वैचारिक प्रबोधन करू लागल्या. बाबा गेले. ताई खचू लागल्या. मार्चच्या शेवटच्या दिवसांत पक्षाघाताने गाठलं. अपर्णाताई कालवश झाल्या. त्यामुळे तीन पैकी एक खांब निखळला.


अपर्णाताई यांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत
1. वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेर्‍या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. हे उदाहरण अपवाद नाही. किचन नका संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.
2. लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत. अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.


महत्वाचे लेख पुढील लिंकवर 
अपर्णा ताई यांनी स्वत:विषयी लिहिलेला लेख
 वादळाशी केला संसार 

लव जिहाद संबधी अपर्णा ताई यांची मुलाखत
लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, April 28, 2020

अ‍ॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन

सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.  पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्‍या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्‍या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.

संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी


वादळाशी केला संसार 

लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई 

Tuesday, January 14, 2020

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशनात भाऊ तोरसेकर यांचे मत

ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन
पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.

Friday, April 6, 2018

वीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण ?


🖋सिद्धाराम भै. पाटील
जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी, गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे असणे कसं शक्य आहे?

Monday, August 14, 2017

देशभक्तीचे दुसरे नाव : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद यांचे वर्णन अनेक विद्वानांनी घनीभूत देशभक्ती या शब्दावलीत केले आहे. अतिशय सार्थ असे हे वर्णन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार संकरी प्रसाद बसू म्हणतात की, 'फ्रान्सच्या क्रांतीवर रूसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया आणि चीन या देशात घडलेल्या क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता, तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता.' भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जवळजवळ सर्वच नेत्यांवर स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या पाश्चात्य शिष्या भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगादान सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असेच आहे. 

विशेष लेख - सिद्धाराम भै. पाटील
विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून...  

स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठे परिवर्तन झाले. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमांत भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु, स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती, आर्जव करीत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळे स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठे परिवर्तन झाले. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारतात स्वाभिमान जागवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. 

प्रा. धरमपाल
थोर चिंतक प्रा. धरमपाल यांच्या शब्दांत सांगायचे तर स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला. आणि यातून देशात जागृतीचे एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जण स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करू लागले. देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली.
लोकमान्य टिळक यांच्या शब्दांत स्वामी विवेकानंद हे राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता होते. कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमधे देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांनी केवळ इतकेच कार्य केले असते तरी त्यांचे वर्णन घनीभूत देशभक्ती किंवा देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद या शब्दावलींनी करता आले असते. परंतु, स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व केवळ येवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत.

स्वातंत्र्य आंदोलनातील नेते स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी घनिष्ट बांधलेले होते तेव्हा म्हणजे १९०५ मध्ये कर्झनने देशाची हिंदू-मुस्लिम आधारावर फाळणी केली; त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभे राहिले. ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली. परंतु, १९४७ च्या सुमारास जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली तेव्हा घात झाला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन धुरीणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. भ्रामक विचार आणि स्वार्थ प्रबळ झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते खंडित होते. देशाचे तुकडे झाले. आपल्या देशाची भूमी आज जिहादी इस्लामच्या गुलामीत आहे. जग त्या भूमीला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून ओळखते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून दूर गेल्याचा, एकांतिक धर्मांचा धोका न ओळखल्याचा हा परिणाम होता.
साऱ्या जगाला सर्वधर्मसमभावाचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी जिहादी इस्लाम आणि धर्मांतरणाला चटावलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यांचा या देशाला असलेला धोका अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज आपला देश भोगत आहे. खंडित भारतातही एकांतिक धर्मीय धर्मांतराच्या माध्यमातून देशाच्या एकतेला नख लावण्याचे काम करत आहेत. 
काश्मीर, नागालॅन्ड, त्रिपुरा, केरळ आदी राज्यातील धर्मांतरे आणि फुटीर चळवळीचे लोण इतर भागातही पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या वाङमयात या धोक्यावरील उपाय अतिशय नि:संदिग्ध शब्दांत सांगितलेले आहेत. आज या आव्हानाला थोपवण्यासाठी देशात ज्या संस्था आणि व्यक्ती कार्य करत आहेत त्या साऱ्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा आयाम आहे.
स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.
स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी बऱ्याच देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.
स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. 
त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथीसुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली. 
भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत. 
स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो (श्रीलंका) येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वत:ला भारतीयच समजत होती हे आपल्या कोलंबोवासीयांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येते. कोलंबो येथे स्वामी विवेकानंदांनी दिलेले पहिले व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशाने दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे. (जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्यासाठी भारतीय व्याख्याने हे पुस्तक वाचावे.)
 भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले. 
वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल असेही त्यांनी सांगितले. भारताने जगाकडून शिकले पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे खरेच आहे; पण त्या बदल्यात भारताने जगाला अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे. ही भारताची नियती आहे असे ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केले.
स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात की, अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहेत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणे नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत. (खंड ३ पृष्ठ २७७-२७८) 
मानवी जातीचे हे आध्यात्मीकरण कसे होणार आहे? हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केले होते.
प्रतीकात्मक चित्र 
स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, ''शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''
विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुसऱ्या ठिकाणी म्हणतात, ''माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''
या दोन्ही गोष्टी वरवर पाहता परस्परविरोधी वाटू शकतील. परंतु, स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की, स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. सर्व धर्म सत्य आहेत.
सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो असे सांगणारे स्वामीजी एकांतिक धर्मीयांच्या धर्मांतरण आणि विस्तारवादाकडे दुर्लक्ष करत नाहीत. एका हिंदूंने धर्मांतर केल्यास आपली संख्या एकाने कमी होते, इतकेच नाही तर शत्रूची एकाने वाढते हे सांगायलाही स्वामीजी विसरत नाहीत. स्वामीजींनी समर्थ भारतासंबंधी वास्तववादी विचार केला आहे, असे दिसते. 
भारत जगला तर जगाला मार्गदर्शन करेल. भारत जगायचा असेल तर येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य घडवून आणले पाहिजे. भारताचे ऐक्य म्हणजे भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, असे स्वामीजी सांगतात. स्वामी विवेकानंदांचे विचार हे शाश्वत विचार आहेत. 
बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, 
''तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि 'पुरुष' व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्या मनुष्य-निर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्य-निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारत भूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.'' (खंड ३ पृष्ठ २२४-२२५)
स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितले आहे पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे. 
''आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचे काम सावकाश पण मूक, शुभ प्रभाती पडणार्या दंवासारखे न दिसणारे, न ऐकू येणारे, तरीही खूप मोठे ङ्गलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणार्या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचार विश्वात झिरपणारे आहे.''
(खंड ३ पृष्ठ ११०).

----
लोकमान्य टिळक यांच्या मते स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल, मवाळ, क्रांतिकारी अशा सर्वच प्रवाहांवर स्वामीजींचा अमिट प्रभाव होता. गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, ऍनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, योगी अरविंद, जवाहरलाल नेहरू ते विनोबा भावे यांच्यापर्यंत साऱ्या देशभक्तांवर स्वामी विवेकानंदांचा थेट प्रभाव होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत होते.
----
 स्वामीजी हे मातृभूमीचे उत्कट भक्त होते. ते भारताशी तादात्म्य पावलेले देशभक्त होते. भारतभक्ती त्यांच्या नसानसांत होती. भारताचे उत्थान म्हणजे येथील सामान्य माणसाचे उत्थान ही त्यांची धारणा होती. भारतातील एक कुत्राही जोवर उपाशी आहे, तोवर मला मुक्ती नको, असे म्हणण्याचे धाडस करणारा संन्याशी म्हणून त्यांची ओळख आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर आधी विवेकानंद वाचा.
----
ज्यांच्या मनात भारताविषयी प्रेमआणि आस्था नव्हती त्यांनी भारतीयांमधील स्वाभिमान मारला. आपल्या देशातील बुद्धिजीवी भारतावर टीका करण्यात धन्यता मानू लागले. भारतात सुधारणा करायच्या असतील तर भारतावर टीका केली पाहिजे. येथील परंपरांवर आघात केले पाहिजे, अशी एक चळवळ त्याकाळी उदयास आली. स्वामीजींनी ती आत्मवंचना थांबवली. 
भारतासाठी काही चांगले करता येत नसेल तर किमान शिव्याशाप देणे तरी करू नका. आधी भारतावर प्रेमकरा. आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला शेकडो दोष दिसतील, पण ते दोष येथील रक्ताचे आहेत हे विसरू नका. येथील सर्वसामान्यांसंबंधीच्या उत्कटतेतून तुमच्या हृदयात प्रेमस्फुरू द्या. भारतातील दीन दलित आणि गरिबांची सेवा ही मोक्षप्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. देशबांधवांप्रतीच्या आत्यंतिक प्रेमातून आपल्या क्षमता विकसित होतात. भारतीय तरुणांच्या क्षमता विकसित होण्यातूनच भारत उभा राहणार आहे. या सर्वसामान्य तरुणांमधूनच माझे कार्यकर्ते पुढे येतील. त्याग आणि सेवा या महान आदर्शांच्या आधारेच भारताचे पुनरुत्थान घडून येईल. माझ्या मृत्यूनंतरही माझे विचार कार्य करत राहतील. तरुणांना जागे करत राहतील, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला होता. आज शेकडो, हजारो तरुण स्वामीजींच्या विचारांने प्रेरित होऊन भारताच्या कानाकोपर्यांत भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करत आहेत, यातून स्वामीजींचे द्रष्टेपण स्पष्ट होते.
-----------
देशभक्तीसंबंधीची माझी स्वत:ची अशी खास कल्पना आहे. प्रथम तुमच्या अंत:करणात भावना जागृत होऊ द्या. आज तुमचे लक्षावधी देशबांधव उपाशी आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या देशावर अज्ञानाच्या अंधाराचे सावट पडले आहे, याची खंत तुम्हाला वाटते का? यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ होता का? लोकांच्या दु:खामुळे तुम्ही जवळजवळ वेडे होऊन जाता का?... देशभक्तहोण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.
 ----------
तुमच्या भावना जागृत होतील, परंतु लोकांना या जीवन्मृत अवस्थेतून वर काढण्याचा व्यावहारिक मार्ग तुम्हाला सापडला आहे का? लोकांना त्यांच्या दैन्यावस्थेत कशी मदत करावी, हे तुम्हाला समजले आहे का? पण असे ज्ञान तुम्हाला झालेतरी पुरेसे नाही. तुमच्या मार्गातील अडचणींचे डोंगर ओलांडण्याचा निर्धार तुमच्याजवळ आहे का? उत्कट भावना, समस्यांची सोडवणूक करण्याचा व्यावहारिक मार्ग आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील, तर तुमच्यापैकी प्रत्येकजण परमेश्वराची कृपा लाभलेल्या या आपल्या देशात अपूर्व चमत्कार घडवून आणू शकेल. देशभक्तीची माझी कल्पना ही अशी आहे. राष्ट्रभक्तीचा महामंत्रच स्वामी विवेकानंदांनी वरील ओळींतून दिला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऋषी बंकीमचंद्र यांच्या आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीचे एक वेगळे स्थान आहे. कादंबरीच्या शेवटी दिलेला संदेश सामान्य वाचकाला गोंधळात पाडतो. परंतु, स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य पाहिले की त्या संदेशाचा अर्थबोध होतो.

तात्कालिक राजकीय संदर्भाने शत्रूशी दिलेला लढा हा आवश्यक असला तरी त्याचा दीर्घकाळ उपयोग नाही. या राष्ट्राच्या शाश्वत मूल्यांसाठी लढा उभारणे, मनुष्य निर्माण करणे हे खरे कार्य आहे. स्वामी विवेकानंदांनी या कार्याची पायाभरणी केली. वर्षामागून वर्षे, शतकामागून शतके जातील तसे हे कार्य वाढत जाणारे आहे. स्वामी विवेकानंदांची काळावर पडलेली सावली ही वाढत जाणारी आहे. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचे महत्त्व सांगितले. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो युवक पुढे येत आहेत. विवेकानंद विचारांच्या मुशीतून घडलेले अनेक जण आज देशाच्या नेतृत्वस्थानी येत आहेत, हा योगायोग नाही; ही या देशाची नियती आहे. 

स्वामी विवेकानंद म्हणतात, 
स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक जेव्हा तुमच्यामधये निपजतील तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल. माणसांनीच तर देश महान बनत असतो. नुसत्या जमिनीच्या तुकड्यात काय आहे.


राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा...  

लोकमान्य टिळक 
दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.

सुरेंद्रनाथ बॅनर्जी
सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.

बिपिनचंद्र पाल
बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.

गोपाळकृष्ण गोखले
गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.
(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)

वि. दा. सावरकर
क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.

महात्मा गांधी
आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस
सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. 

रवींद्रनाथ टागोर
रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.

जवाहरलाल नेहरू
चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.

इंदिरा गांधी
इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.

सर्वपल्ली राधाकृष्णन
डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.

डॉ. एपीजे कलाम
डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.

नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.

-------

स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.

स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.

स्वामी विवेकानंद म्हणतात,
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !

विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार vivekvichar.vkendra.org

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी