हिंदुत्ववाद्यांच्या जागरुकतेमुळे
69 गायींचे प्राण वाचले
सोलापूर : बकरी ईदचे निमित्त करून मंगळवारी जोडभावी पेठेतील चिरागअली तकीया मदरशात आठ गायींच्या कत्तली करण्यात आल्या. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या जागरुकतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले. मुस्लिम तरुणांच्या हटवादी भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याखाली बापू मोतीवाला, महंमद इसाक अब्दुल सत्तार खडके, अब्दुल समद इसाक माडी, सिकंदर उस्मान अलमेलकर, अब्दुल रसिद अली शेख व इतर 3 ते 4 खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नरेंद्र काळे यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून 11 जिवंत गाई व 58 बैल तसेच 125 किलो जनावरांचे मांस मिळून आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. जोडभावी पेठ येथे चिराग अली रोशन मशिदीच्या समोर मदरशाचे मोठे आवार आहे. या आवारात जनावरांचा बेकायदा कत्तलखाना आहे. येथे मोठ्या संख्येने गायी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरून मंगळवारी सकाळी 40-45 कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता आठ गायींची कत्तल झाल्याचे आढळून आले. कार्यकर्त्यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना खबर दिली आणि तेथे बांधलेल्या गायी ताब्यात घेतल्या. यावेळी मदरसा कम् कत्तलखान्यातील लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही बाजूने गर्दी झाली होती. दरम्यान कत्तल झालेल्या गायींचे मांस पोत्यात भरून दुसरीकडे हलविण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी गायी गोशाळेत सांभाळण्यासाठी देण्याची मागणी केली, तर कत्तलखान्याच्या लोकांनी गायी आमच्या आहेत, त्या देणार नाही! असे सांगितले. यावरून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप केला. मदरशात बेकायदा बांधून ठेवण्यात आलेल्या 69 गायी ताब्यात घेऊन पालिकेच्या कोंडवाड्यात पाठवून दिल्या. बकरी ईदच्या दिवशी बकरीशिवाय अन्य जनावरांची कत्तल करू नये आणि गोहत्या करू नये असा कायदा आहे, तरीही बिनबोभाट गोहत्या करण्याचा प्रकार घडल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. गोहत्याबंदीचा शासकीय आदेश कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखविला तेव्हा पोलिसांनी सर्व गायी ताब्यात घेऊन कोंडवाड्यात पाठवून दिल्या. गोहत्याबंदीच्या कायद्याविषयी पोलीस अज्ञानी असल्याचे आढळून आल्याने घटनास्थळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व जनावरांची सोडवणूक झाल्यानंतर त्यांना कोंडवाड्यात सोडताना अज्ञात लोकांनी किरकोळ दगडफेक केली. त्यामध्ये चंदुभाई देढीया यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर काहीजणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काणे करीत आहेत.
मदरशाच्या आवारात
बेकायदा कत्तलखाना
हिंदुत्ववादी संघटनांच्या सतर्कतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत. जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया मशिदीसमोरील मदरशाच्या आवारात बेकायदा कत्तलखाना किती दिवसांपासून सुरू आहे? महापालिकेने परवानगी दिली का? तसे असेल तर कोणत्या आणि कशा गायींची कत्तल केली जाते? त्या गायींची तपासणी होते का? ज्या मदरशाचा कत्तलखाना म्हणून वापर होतो ती जागा कोणाच्या मालकीची आहे? रोज किती जनावरांची कत्तल होते, याची नोंद आहे का? मशीद आणि मदरसा यासमोरील सार्वजनिक रस्ताच मोठे लोखंडी फाटक बसवून नियंत्रित करण्यात आला आहे. हे अतिक्रमण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले कसे? गोहत्याबंदी असताना धाडसाने जनावरांची, गायींची कत्तल होते. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो? असे अनेक प्रश्न गोहत्येच्या निंद्य प्रकाराने उपस्थित झाले आहेत.
दै। तरुण भारत, पान १
१० दिसम्बर २००८
No comments:
Post a Comment