Sunday, August 26, 2018

एक आठवण फखरुद्दीन बेन्नूर यांची


 
वार्तालाप सुरू झाला. बेन्नूर सरांची विद्वत्ता स्तिमित करणारी हाेती. मांडणीही खूप सुंदर. परंतु, थोड्याच वेळात मी अस्वस्थ झालो. स्तब्ध होण्याची वेळ माझ्यावर आली.
बेन्नूर सर सांगत होते....



 माझी पत्रकार बनण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हाची गोष्ट. पत्रकारितेत मी खूपच नवखा होतो. दमाणी पुरस्कार जाहीर होणार होते. त्या पत्रकार परिषदेला मला पाठवण्यात आले.
सोलापूरच्या जाम मिलमध्ये ती पत्रकार परिषद होती. मी पहिल्यांदाच भय्या चौक ओलांडून त्या भागात गेलो. शोधत गेल्यामुळे जायला उशीर झालेला. माझ्यासाठी ही पहिलीच पत्रकार परिषद होती.
मी पोहोचलो तेव्हा ती संपत आलेली. तेथील पत्रकारांत मीही मिसळून गेलो. पण समोर बसलेले मान्यवर काेण आहेत, याची मला कल्पना नव्हती. ज्यांच्यात मी बसलो होतो, त्यातील एकाही व्यवसायबंधूला मी ओळखत नव्हतो.
मी भीत भीतच शेजारच्या पत्रकाराला विचारले, "आता बोलत हाेते ते कोण?’.
त्या पत्रकाराने अतिशय तुच्छतेने पाहिले आणि म्हटले, मग आलासच कशाला?.
थोडक्यात, माझ्या अज्ञानाबद्दल त्यांना कीव वाटली.
मी गांगरून गेलो होतो.
नंतर मला समजले की ते मोठे लेखक आहेत.
वात्रटीकाकार आहेत.
रामदास फुटाणे त्यांचं नाव.
शिंदे साहेबांचे ते फार जवळचे असल्याचे मी ऐकले होते.
सोलापुरात अशी अनेक मोठी नावं आहेत. त्यापैकीच एक फक्रुद्दीन बेन्नूर. त्यांचे नुकतेच निधन झाले. थोर पुरोगामी विचारवंत होते ते.
मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्ष कधी पाहिलो नव्हतो. तो योग सोलापूर श्रमिक पत्रकार संघामुळे जुळून आला.
तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम आपल्या पदावरून निवृत्त होणार होते. संपुआ सरकारने या पदासाठी प्रतिभाताई पाटील यांचे नाव पुढे आणले होते. यावर देशात मोठी चर्चा सुरू होती.
काहींचे म्हणणे होते की डाॅ. कलाम यांना पुन्हा संधी मिळावी. अशा वेळी राष्ट्रपतिपदाची निवडणूक असते कशी... इत्यादी बाबींवर पत्रकारांना सखोल माहिती व्हावी, या हेतूने जाणकार व विद्वान व्यक्ती म्हणून प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्याशी पत्रकारांचा वार्तालाप ठेवला होता.
पत्रकारितेत आता मी थोडा स्थिरावलो होतो. आणि बेन्नूर सरांच्या वार्तालापाला मला पाठवण्यात आले. नवीन काही शिकायला मिळणार याची उत्सुकता होती.
वार्तालाप सुरू झाला. बेन्नूर सरांची विद्वत्ता स्तिमित करणारी हाेती. मांडणीही खूप सुंदर. परंतु, थोड्याच वेळात मी अस्वस्थ झालो. स्तब्ध होण्याची वेळ माझ्यावर आली.
बेन्नूर सर सांगत होते, "डाॅ. कलाम हे कुठले शास्त्रज्ञ, ते तर केवळ टेक्निशियन आहेत. लोकांनी त्यांना विनाकारण चढवून ठेवले आहे...' असा एकूण आशय होता त्यांच्या मांडणीचा. त्याच वार्तालापात त्यांनी अरुंधती राॅय यांचा संदर्भ देत अफजल गुरू याच्यावर अन्याय होत असल्याची मांडणी केली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ज्याला दोषी मानले त्याचे हे उदात्तीकरण माझ्यासाठी नवीन होतं.
आणि तेथे कोणीही या मुद्द्यावर काही विचारले नाही.

बेन्नूर सरांना प्रश्न करावं, असं मनात वाटू लागलं. पण धाडस होत नव्हतं. इतर सारे अनुभवी पत्रकार होते. त्यांच्यासमोर आपण कसं विचारावं अशी भीती होती.
वार्तालाप संपून आभार प्रदर्शनाला सुरुवात होणार तेव्हढ्यात मन घट्ट करून मी म्हटलं, ‘सर, मला प्रश्न विचारायचाय..’.
त्यांनी अनुमती दिली.
मी म्हटलं, ‘ज्यांना अख्खं जग मिसाइल मॅन म्हणतं. ज्यांच्या देशप्रेमाबद्दल सारेच नतमस्तक होतात, अशा डाॅ. कलाम यांना आपण हिणवता अन् न्यायालयाने देशद्रोही ठरवलेल्या अफजल गुरूची बाजू घेता हे कसं?’
माझ्या प्रश्नाने एकदम शांतता पसरली. सगळे माझ्याकडे पाहू लागले. छातीत धडधड होत होती.
बेन्नूर सर म्हणाले, "होय. त्याला कारण आहे. गुजरातेत हजारो लोकांची कत्तल होत असताना ही व्यक्ती राष्ट्रपती पदावर होती. तिने एक चकार शब्द उच्चारला नाही.’
बेन्नूर सरांच्या या तर्काचं मला फार नवल वाटलं.
तेव्हढ्याच तत्परतेने मी म्हटलं, ‘सर असेच विचार करायचे झाले तर... १९८९ नंतर काश्मिरमध्ये हजारो लोकांची कत्तल झाली. महिलांवर अत्याचार झाले. लाखो लोकांना राहतं घर, गाव सोडून आपल्याच मायभूमीतून परागंदा व्हावं लागलं...
त्यावेळी कोणीतरी राष्ट्रपती पदावर असेलच की... त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही बोलले?’
माझ्या या फालतू प्रश्नाने अनेक पत्रकार माझ्यावर क्रुद्ध झाल्याचे दिसत होते.
माझा हा प्रश्न कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा लायकीचा आहे, असे अनेकांना वाटले असावे. त्यामुळे घाई गडबड आहे, असे दाखवत वार्तालाप कार्यक्रम संपवून आभार प्रदर्शनाला सुरुवात झाली.
माझ्यासाठी हा फार मोठा धक्का होता. पुरोगामी म्हणजे काय? प्रतिगामी म्हणजे काय? वगैरे प्रश्न मला आणखीनच छळू लागले.
दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात काय छापून येणार याची मला प्रचंड उत्सुकता लागून राहिली.
सकाळी सात रस्ता चौकात जाऊन सगळी वृत्तपत्रे आणली. उत्सुकतेने चाळली. मी चकित झालो. कोणत्याच वृत्तपत्रात मी विचारलेल्या प्रश्नांची दखल घेतल्याचे दिसले नाही.
मी तरुण भारतचा पत्रकार होतो. तरुण भारतमध्ये मी दिलेली बातमी कलाम-अफजल गुरू मुद्द्यांसह आली होती.
थोडं बरं वाटलं.
परंतु, असं का झालं, यावर मी फार विचार केला. मला उत्तर मिळाले नाही.
चार महिन्यांनंतर मला समजले की, बेन्नूर सरांची बातमी का दिली... तसं काही घडलंच नव्हतं... असे सांगण्यासाठी काही पत्रकार मंडळींनी आमचे संपादक व संचालक मंडळ यांची भेट घेऊन गेले होते. परंतु, संपादक किंवा संचालक यांनी मला तेव्हाच का विचारणा केली नाही, असा प्रश्न पडला.
त्याचं उत्तर मी शोधून काढलं ते असं. संचालकांनी विचारलं, रिपोर्टिंगला कोण गेलं होतं?. रिपोर्टिंगला मी होतो, हे समजलं. त्यावर त्यांनी अरे मग काय प्राॅब्लेम नाही म्हणून सोडून दिलं.
माझ्या रिपोर्टिंगवरचा हा विश्वास मला सुखावून गेला.
अर्थात, संपूर्ण वार्तालापाचे तेव्हाच्या वाहिन्यांनी चित्रीकरण केल्याचे मला माहित होते. तो एक आधार होता.
पत्रकारांच्या माध्यमातून बेन्नुर सर जनतेला जे सांगू पाहत होते ते मी प्रामाणिकपणे पोचवले. बेन्नूर सरांना माझी बातमी नक्कीच आवडली असेल.
परंतु, काही पत्रकार मंडळींनी का तक्रार केली हे मला समजले नाही. ते माझ्या प्रश्नाने अस्वस्थ का झाले होते हे मला अद्याप समजले नाही.
थोडक्यात, बेन्नूर सरांच्या वार्तालापाने माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांना खूप धन्यवाद आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी